esakal | राज्यावर कोरोनाचं भयानक संकट; यात्राबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Festival

राज्यावर कोरोनाचं भयानक संकट; यात्राबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ

sakal_logo
By
​मुकुंद भट

ओगलेवाडी (सातारा) : शासनाने वाढत्या कोरोनामुळे (Corona) 15 मेपर्यंत लॉकडाउन (Lockdown) वाढवला आहे. जमाव व संचारबंदी (Government Bans) आहे. गावोगाव भरणाऱ्या दैवतांच्या यात्रा व मिरवणुकांवर बंदी घातली आहेत. त्यामुळे परिसरात ग्रामीण भागात यात्रा होणार नसल्याने गावकरी व यात्राप्रेमींच्यात निरुत्साहाचे वातावरण आहे. यात्रा (Festival) या ग्रामीण लोकसंस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. पण, त्या सध्या नसल्याने गावोगावचा उत्साह व आनंद हरवला आहे. (Government Bans Village Festival Due To Coronavirus Satara News)

दरवर्षी गुढीपाडव्यानंतर चैत्र महिना सुरू झाल्यावर ग्रामीण भागात गावोगावी ग्रामदेवतांच्या यात्रा भरतात. ही यात्रा म्हणजे बाळगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत आनंदाची पर्वणी असते. दूरवरचे नातलग व पाहुणे जत्रेसाठी गावाकडे येतात. दरवर्षी यात्रेचे चित्र कोरोनामुळे यंदा नसल्याने गावोगावी लोकांच्यात उत्साह नाही. यात्रेअभावी कुस्तीचे फड नसल्याने पैलवानांच्यात निराशा व बेकारी आहे. हजारमाचीचे (ता. कऱ्हाड) कुस्ती मैदान संयोजक व कुस्तीप्रेमी पैलवान अतुल पवार म्हणाले, ""कौशल्य व चपळाईची कुस्ती कला आहे. हजारमाची या छोट्या गावाने महिला कुस्ती व परदेशी पैलवानांच्या कुस्त्या सुरू केल्या. पण, शासनाने कुस्ती मैदान भरण्यावर बंदी घातली आहे.'' बैलगाडी शर्यतीवरील बंदीबद्दलही बैलगाडी शर्यत शौकिन व कऱ्हाड तालुकाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.

Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार

लॉकडाउनमुळे ग्रामदेवतांची मंदिरे दर्शनासाठी बंद आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट व शांतता आहे. यात्रेतील मिरवणुकीवर बंदी असल्याने पालखी मिरवणूक, छबिना होणार नाहीत. त्यामुळे वाद्य कलाकारांना काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. यात्रेनिमित्त तेथे थाटणारी खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने, फिरते पाळणे आदी छोटे व्यावसायिक, महाप्रसाद तयार करणारे आचारी, गावातील मध्यवर्ती असणाऱ्या झाडाजवळ पारावर भरणारे मनोरंजन करणारे छोट्या- छोट्या तमाशा कार्यक्रमांवर बंदी असल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यांच्याबरोबर यात्रेनिमित्त नातलग, पाहुणे व हितचिंतकांच्या होणाऱ्या भेटी व घरच्या प्रेमाचा पाहुणचार व आदरातिथ्य आदी सर्वच हरवल्याचे परिसरात दिसते.

Government Bans Village Festival Due To Coronavirus Satara News