

Karad Battles Grain Black Market, Enforcement Machinery Falls Short
sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: काळ्या बाजारात धान्य विकण्यासाठी खासगी गोदामात लपवलेले २२२ पोत्यांतील ११ टन गहू आणि तांदूळ कऱ्हाडच्या पुरवठा विभागाने छापा टाकून पकडले. जप्त झालेले साडेतीन लाखांचे धान्य सरकारी आहे, की दुकानदारांचे? हा तपासाचा भाग असला तरी धान्याचा काळा बाजार पुन्हा डोके वर काढतो आहे. तालुक्यात तीन वर्षांत धान्याच्या काळाबाजाराशी निगडीत ३३ गुन्हे दाखल आहेत. त्यात ४६ संशयितांना अटक आहे, तर ७० लाखांचे सरकारी धान्य कारवाईत जप्त आहे. सरकारमान्य स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराला रोखण्यासाठी पुरवठा शाखेची यंत्रणाही तोकडी पडते आहे. गरिबांचे पोट भरण्यासाठी शासन देत असलेल्या धान्यावर काळा बाजार करणाऱ्या माफियांची टोळी थेट यंत्रणेला आव्हान देत आहे.