पथनाट्य कलाकारांमुळे प्रचारातील रंगत वाढली; साेशल मिडीयावरही धुरळा

ऋषिकेश पवार
Monday, 11 January 2021

कोरोनामुळे थांबलेली कला ग्रामपंचायत निवडणुकांमुळे जिवंत झाली आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पथनाट्याला मागणी असल्याने आम्ही कलाकार मंडळी कामाला लागलो आहोत. अनेक महिन्यांनंतर कलेला व्यासपीठ आणि रोजगारही मिळणार आहे असे सचिन महाजन (पथनाट्य कलाकार) यांनी नमूद केले.

विसापूर (जि. सातारा) : ग्रामपातळीवरील महत्त्वाची निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Gram Panchayat Election) प्रक्रियेतील अर्ज भरणे, मागे घेणे व चिन्हे वाटप ही प्रक्रिया पूर्ण होऊन लढती स्पष्ट झाल्याने आता खटाव तालुका उत्तर भागात खऱ्या अर्थाने प्रचारामध्ये रंगत वाढू लागली आहे. गावागावांत ठिकठिकाणी कोपरा सभा भरू लागल्या असून, घरोघरी उमेदवारांच्या भेटी सुरू झाल्या आहेत. 

पुसेगाव येथे महाविकास आघाडीने निवडणुकीत पॅनेलची भूमिका आणि निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांचा अजेंडा जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पथनाट्याचा वापर केला आहे. अभिनयाच्या माध्यमातून मतदारांच्या मनात जागा करण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजप्रबोधनासाठी केल्या जाणाऱ्या पथनाट्याचीदेखील निवडणुकीच्या प्रचारात भर पडल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. गावातील दुसऱ्या सत्ताधारी जनशक्ती संघटनेच्या उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींवर चांगला जोर दिलेला दिसून येत आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच बाजा मारणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा 

मतदानासाठी काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने या ठिकाणी प्रचाराची जोरदार रणधुमाळी उडाली आहे. गावागावांतील सर्व पॅनेल नवनवीन कल्पना राबवत प्रचार करताना दिसत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने यथाशक्ती नवनवीन संकल्पनांचा वापर करून प्रचार करत आहेत. खरेतर प्रत्यक्षात फिल्डवरील प्रचार रंगत असतानाच सोशल मीडियावरच्या प्रचारावरही उमेदवारांनी चांगलाच जोर दिला आहे. माहितीपत्रकाचे फोटो, उमेदवारांचे आकर्षक व्हिडिओ आदींचा वापर करून व्हॉट्‌सऍप, फेसबुकच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा सत्ताधारी पॅनेलइतकेच विरोधी पॅनेलचेही उमेदवारही आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकूण काय नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सर्वत्र दिसत आहे. 

महाबळेश्‍वर : साडे सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहीरीतील गव्यास जीवदान 

निवडून येण्यासाठी उमेदवार वाटेल ते करण्यास तयार असतात. त्यांच्याकडे प्रचार हे प्रभावी साधन सोबत असते. प्रचाराचे स्वरूप बदलत असताना अनेक नवे फंडे निवडणुकीत आजमावले जातात. कोपरा सभा, पदयात्रा, जाहीरनामे, वैयक्तिक गाठीभेटी या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा आटोकाट प्रयत्न पॅनेलप्रमुख करतच आहेत. मात्र, काहींनी तर गुप्त बैठका घेऊन ओल्या पार्ट्यांनाही सुरुवात केली आहे. आता त्याबरोबरच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्यालाच मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र सध्या या परिसरात दिसून येत आहे. 

भाविकांनाे! पुसेगावात तीन दिवस जमावबंदी, संचारबंदी लागू 
 

""कोरोनामुळे थांबलेली कला ग्रामपंचायत निवडणुकांमुळे जिवंत झाली आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पथनाट्याला मागणी असल्याने आम्ही कलाकार मंडळी कामाला लागलो आहोत. अनेक महिन्यांनंतर कलेला व्यासपीठ आणि रोजगारही मिळणार आहे.'' 

सचिन महाजन, पथनाट्य कलाकार

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Campaign By Folk Artists Social Media Satara News