महागाईने मोडणार सामान्यांचे कंबरडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation

महागाईने मोडणार सामान्यांचे कंबरडे

सातारा - सततच्या महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकार एकामागून एक धक्के देताना दिसत आहे. सिलिंडरच्या दरात वाढ, भाजीपाला महाग तर आता ब्रँडेड, नॉन बँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (सोमवार) होणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून महागाईमुळे ‘सांगा जगायचं तरी कसं?’ असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्‍न पडला आहे.

देशभरात जीएसटी लागू करून केंद्र सरकारला पाच वर्षे पूर्ण झाली. २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू करताना अन्नधान्यावर जीएसटी लावणार नसल्याचे केंद्राने आश्वासन दिले होते. मात्र, आता अन्नधान्य व खाद्यपदार्थावर जीएसटी लावली आहे. त्यामुळे आधीच महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेवर जीएसटीचा बोजा पडणार असल्याने सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.

या जीएसटीत अन्नधान्याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर, ताक, चिरमुरे, गूळ, पापड यांसारख्या वस्तूंवर कर लावून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम केले आहे. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी यांसारखी रोजच्या वापरातील धान्य, कडधान्यावर जीएसटी लागू केल्याने दर कडाडणार आहेत. याचबरोबर गेल्या आठवड्यात सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत एक सिलिंडर एक हजार ६० रुपयांवर पोचला आहे.

पेट्रोल, डिझेलची कपात काढली भरून

गेल्या आठवड्यात राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त केले. त्यामुळे एका बाजूला काही प्रमाणात दिलासा मिळत असतानाच केंद्र शासनाने दुसरीकडे जीएसटी लागू, खतांची, सिलिंडरची दरवाढ करून सर्वसामान्यांना पुन्हा खिंडीत गाठल्याचे दिसत आहे.

अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा मोठा परिणाम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. एक देश, एक कर संकल्पनेनुसार बाजार समिती कर असल्यामुळे सर्व खाद्यान्न वस्तू, धान्य व कडधान्यांवर जीएसटी नसावा.

- गुरुप्रसाद सारडा (अध्यक्ष, मर्चंट चेंबर ऑफ कॉर्मस, सातारा)

भाजप सरकार सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत आहे. गेल्या तीन महिन्यांत खतांचे दर दुप्पट वाढल्याचे दिसून येते. सध्या ऊस लागण, पेरणीचा हंगाम असून खते घेताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतही अवकाळी पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

- प्रमोद जगताप (शेतकरी)

सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने एक हजाराच्या पुढे सिलिंडर मिळत आहे. एखादे मोठे कुटुंब असल्यास वीस ते पंचवीस दिवसांत सिलिंडर संपत आहे. रोज लागणारा भाजीपालाही कमी होत नाही. त्यामुळे सततच्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

- सुवर्णा जगदाळे (गृहिणी)

Web Title: Gst On Food Grains Food From Today Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :inflationGSTFood Grains
go to top