Gudi padwa 2023 : काय खावे,काय टाळावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संचालिका डॉ. मालविका

Gudi padwa 2023 : काय खावे,काय टाळावे?

सातारा : गुढीपाडवा हा शक्तीच्या उत्क्रांतीचा उत्सव आहे, असे श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे सांगत. सृजनता वाढावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. ब्रह्मध्वजात ही ऊर्जा असते सृजनाचे अस्तित्व असते, असे प्रतिपादन ‘संतुलन आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांनी आज केले.

तर ऋतुबदल होत असताना आपला आहार कसा असावा? याविषयी संचालिका डॉ. मालविका तांबे यांनी मार्गदर्शन केले. गुढीपाडव्याचे महत्त्व आणि तो साजरा करण्याची पद्धत व आहाराविषयी सुनील आणि मालविका तांबे यांनी वेबिनारच्या माध्यमातून तनिष्कांशी संवाद साधला. ‘सकाळ’चे संचालक-संपादक श्रीराम पवारही यावेळी उपस्थित होते.

या संवाद सोहळ्यात महाराष्ट्र आणि गोव्यातून तनिष्का मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला गुढी कशी तयार करायची आणि उभारायची याचे प्रात्यक्षिक सुनील तांबे यांनी करून दाखविले.

गुढीच्या बांबूला तिळाच्या तेलाचे अभ्यंग, स्नान ही प्रक्रिया दाखवून कडुनिंबाची पाने, साखरेच्या गाठीचे हार, दवणा, फुलांचा हार आणि तांब्या म्हणजेच कलश कसा बांधायचा? हे त्यांनी स्पष्ट केले. गुढी हा ब्रह्मध्वज का आहे? तेही त्यांनी सांगितले. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या सशास्त्र गुढीपूजनाची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली.

त्यानंतर डॉ. मालविका तांबे यांनी लहानपणी साखरेच्या गाठी आणि सणादिवशी श्रीखंड पुरी खाण्याचा आनंद, कुणाची गुढी किती उंच? याच्या चर्चा कशा चालत ते खुसखुशीत शब्दांत सांगितले. नवीन वर्षाचे स्वागत फटाक्यांनी, जागरण करून करायचे नसते तर आपण निसर्गातून आलो आणि निसर्गात परत जाणार आहोत, याचे भान देणाऱ्या गुढीपाडव्यापासून करायचे असते, आयुर्वेद हे जीवनशास्त्र आहे. जगण्याची कला आहे हे त्यांनी सांगितले.

तनिष्कांनी विचारलेल्या प्रश्र्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. डॉ. मालविका तांबे यांनी आहारातील कडुनिंबाच्या चटणीचे महत्त्व सांगितले. तर सुनील तांबे यांनी पाच मिनिटे ओंकार साधना करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचा समारोपही सामूहिक ओंकार उच्चारणाने झाला.

काय खावे,काय टाळावे

  • उसापासून केलेली साखर खावी, खडीसाखर अधिक चांगली.

  • फ्रोझन डेझर्ट मानले जाणारे गोड पदार्थ टाळावे

  • खीर, बासुंदी, जिलेबी गरम गरम खावी

  • गुलकंदाचा मिल्कशेक मुलांना द्यावा

  • कंदापासून तयार केलेली साखर टाळावी