गौणखनिजाची अवैध वाहतुकीस GPS बंधनकारक | Satara GPS mandatory transportation Govt illegal traffic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jcb

Satara News : गौणखनिजाची अवैध वाहतुकीस GPS बंधनकारक

कऱ्हाड : गौणखनिज उत्खननाचा परवाना घेतला, की त्याची किती आणि कधी वाहतूक करावी, यासाठी नियम आहेत. मात्र, तरीही प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून त्याची अवैधरीत्या वाहतूक सुरूच असते. त्यातून शासनाचाही लाखो रुपयांचा महसूलही बुडतो.

त्यामुळे आता उत्खनन केलेल्या गौणखनिजाची वाहतूक करताना ती जीपीएस यंत्रणा बसवलेल्या वाहनातूनच करावी हे संबंधित वाहनधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता अवैधरीत्या होणाऱ्या वाहतुकीला चाप बसणार असून, प्रशासनाकडून जीपीएस नसणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जाणार आहे.

वाळू, माती, मुरूम, डबरसह अन्य गौणखनिजांचे उत्खननास शासनाकडून परवानगी देण्यात येते. त्यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होतो. त्यामुळे अनेकांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होते. मात्र, उत्खनन होताना अनेकदा ते अवैधरीत्या केले जाते. त्यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडतो.

त्याचबरोबर उत्खनन केलेल्या गौण खनिजांची वाहतूक करताना ती अनेकदा अवैधरीत्या, क्षमतेपेक्षा जास्त केली जाते. त्याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या नियमांना डावलूनही अनेकदा वाहतूक केली जात असल्याचे यापूर्वी महसूल विभागाने केलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. त्यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो.

त्याचा विचार करून आता शासनाने गौणखनिज वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित जीपीएस प्रणाली त्या- त्या जिल्ह्यातील खनिकर्म विभाग व आरटीओ प्रादेशिक परिवहन विभागाच्या जीपीएस प्रणालीशी लिंक

जिल्हास्तरीय समितीचे राहणार नियंत्रण

गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक यासंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर नियंत्रण आणून संबंधित विभागांचे समन्वय राहावा, यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

त्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य असून, जिल्हा खनिकर्म अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. संबंधित समितीची आवश्यकतेनुसार बैठक घेऊन अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक याचा आढावा घेतला जाणार आहे.

अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले

जिल्ह्याच्या बहुतांश भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक केली जात असल्याचे यापूर्वी महसूल विभागाने केलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. त्याचबरोबर गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

त्यावर देखरेख करणारी कोणतीही व्यवस्था संगणकीय यंत्रणा नसल्याने दिवसेंदिवस गौणखनिजाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढत अवैध वाहतूकही होत होती. मात्र आता जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आल्याने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.

गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवून घेण्यासाठी खाणपट्टाधारक, क्रशर चालक, गौण खनिज वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर मालक या सर्वांना कळवण्यात आले आहे. संबंधितांनी ते वाहतुकीच्या वाहनांना बसवणे बंधनकारक आहे. सर्व्हर नियंत्रणाचे काम पुण्यातील शौर्य प्रणालीद्वारे स्वतंत्ररीत्या करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

- विजय पवार, तहसीलदार, कऱ्हाड