कऱ्हाड पोलिसांमुळे गुंडाला टपकाविण्याचा त्यांचा प्लॅन फसला

हेमंत पवार
Monday, 13 July 2020

शहरातील गुंडगिरी मोडुन काढण्यासाठी पोलिसांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामीनावर सुटलेल्या गुंडांकडून गुन्हेगारी कृत्य सुरू आहेत. त्यातुनच हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र या घटनेच्या मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
 

कऱ्हाड ः शहरातील मध्यवर्ती भागातील चौकात पोलिस रेकॉर्डवरील गुंड अभिनंदन झेंडे याच्या खुनाचा प्रयत्न पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने उधळून लावला. गुन्ह्याच्या तयारीत असणारी चौघांची टोळीही गजाआड करण्यात आली असून संबंधिताकडून कोयता, विळा, दांडके जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी झेंडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन आशिष अशोक पाडळकर (वय 33, रा. सनसिटी, मलकापूर), अनिकेत रमेश शेलार (वय 21, रा. शास्त्रीनगर, मलकापूर), इंद्रजीत हणमंतराव पवार (वय 23, रा. लाहोटीनगर, मलकापूर), सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी दिली.
साताऱ्याच्या कंदी पेढ्यांविषयी उदयनराजे म्हणाले... 

गुरव म्हणाले, शहरातील गुन्हेगारीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कंबर कसली आहे. त्यांनी अनेकांवर विविध कायद्यान्वये कारवाई करून गुंडगिरी नियंत्रणात आणली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकजण कऱ्हाड शहर सोडून पसार झाले आहेत. काल रात्री अभिनंदन झेंडे हा शाहू चौकातील केसकर्तनालयात असल्याची माहिती संशयित अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार, सुदर्शन चोरगे व आशिष पाडळकर यांना मिळाली. त्यावरुन ते झेंडेवर खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने कार मधून तेथे गेले. ते केशकर्तनालयाच्या बाहेर थांबले. यावेळी त्यांच्या गाडीत कोयता, विळा या हत्यारांसह दांडके होते. अभिनंदन झेंडे दुकानातून बाहेर पडताच चारही संशयितांनी झेंडेसह त्याच्या मित्रांबरोबर वादावादी करून अभिनंदनच्या गळ्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याने तो वार चुकवला आणि तो व त्याचे मित्र केशकर्तनालय दुकानाचा दरवाजा लावुन आत जाऊन लपून बसले. त्यावेळी त्याने दुकानाचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला. मात्र तरीही संशयितांनी दरवाजावर कोयत्याने वार करून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद

दरम्यानच्या कालावधीत अभिनंदन झेंडेच्या मित्रांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना फोनवरुन दिली. त्यांनी तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संशयितांना हत्यारासह ताब्यात घेतले. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अभिनंदन झेंडेवरील हल्याचा डाव उधळण्यात यश आले. याप्रकरणी अभिनंदन झेंडेने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री. गोडसे, हवालदार नितीन साळवे, देवा खाडे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे,चव्हाण, होमगार्ड अमोल जंगम, अक्षय निकम, गणेश खुडे, चंद्रशेखर म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु 

शहरातील गुंडगिरी मोडुन काढण्यासाठी पोलिसांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामीनावर सुटलेल्या गुंडांकडून गुन्हेगारी कृत्य सुरू आहेत. त्यातुनच हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र या घटनेच्या मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर 

कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी उंब्रज पोलिसांची आयडिया वाचा

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gundas Life Saved Due To Karad Police Alertness In Satara District