Hanuman Jayanti : नवसाला पावणारा कलेढोणचा 'मारुतीराया'; काय आहे खासियत? जाणून घ्या इतिहास

खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) पूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे कलेढोणच्या मारुतीरायाची.
Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Kaledhon Marutiraya Khatav Talukaesakal
Summary

गावातील जाणकारांच्या मतानुसार १८ व्या शतकात मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली.

Hanuman Jayanti Special : खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) पूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे कलेढोणच्या मारुतीरायाची. सातारा- सांगली जिल्ह्यांच्या सीमेजवळचा मारुतीराया (Maruti Raya) म्हणजे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान होय. या पांढरीच्या दैवताची यात्रा आजपासून सुरू होत आहे.

मंदिराची स्थापनेचा इतिहास

गावातील जाणकारांच्या मतानुसार १८ व्या शतकात मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली. पश्‍चिममुखी असणाऱ्या मारुती मंदिरात देवाच्या दोन मूर्ती आपणास दिसतात. यातील एक डाव्या बाजूस असणारी मूर्ती हे देवाचे मूळस्थान आहे, तर १९ व्या शतकात देवळात दुसरी नव्याने मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या काळातील भाविकांच्या सांगण्यानुसार देवळातील मूळ स्थानावरील मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्याच्या तत्कालीन ग्रामस्थांनी घेतला होता.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Kaledhon Marutiraya Khatav Taluka

मात्र, मूळ दगडी मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना करताना जागेवरून हलली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नवीन मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मंदिरात आपणास दोन मूर्ती पाहावयास मिळतात. मूळ मूर्तीने आपली जागा न सोडल्याने गावातील भाविकांची मारुतीरायावर श्रद्धा आणखी द्विगुणित झाली. तेव्हापासून कलेढोणचा मारुतीराया हा कलेढोण व पूर्व भागातील १२ गावांचे व वस्तीवरील लोकांचे श्रद्धास्थान नावारूपास आले.

दुमजली व जुन्या धाटणीचे लाकडी मंदिर

मारुती मंदिरातील गाभाऱ्याचा चौथरा व मंदिरातील पूर्व- पश्‍चिमेकडील भिंतींसाठी दगडांचा वापर केला आहे. चौथरा व भिंतीचा भाग सोडल्यास मंदिर उभारणीसाठी लाकडांचा वापर केला आहे. या मंदिरातील ८० टक्के भाग हा लाकडांपासून तयार करण्यात आला आहे. मंदिरातील गाभाऱ्यासमोरील भव्य लाकडी खांब, मंदिरावर उभारण्यात आलेल्या जुन्या धाटणीच्या खोल्या, पायऱ्या आदी भाग लाकडांपासून तयार करण्यात आल्या आहेत.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Karnataka Election : मुस्लिमांचं कोणतंही आरक्षण संपणार नाही; निवडणुकीपूर्वी अमित शहांचं मोठं आश्वासन

झाडांवरच्या गुलालातून झाले मंदिर

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात जीवन जगताना व वैचारिक आदानप्रदान करताना मतभेद होत राहतात. असेच काही मतभेद १८ व्या शतकातील शेतकऱ्यांच्या बाबतीत व्हायचे. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावरच्या महाकाय झाडांच्या मालकीवरून मतभेद होत होते. त्यातून ते झाड कोणाच्या मालकीचे? यावर उत्तर शोधणे कठीणच होते. यावर तोडगा म्हणून गावातील दबडे-पाटील घराण्यातील लोकांनी पुढाकार घेतला. यातून त्या महाकाय झाडांवर मारुतीरायाच्या नावाचा गुलाल टाकायचा. मारुतीरायाचा गुलाल टाकलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचे कोणाचे धाडस होत नव्हते. या झाडांपासून तयार झालेल्या लाकडांचा वापर मंदिर उभारण्यासाठी करण्यात आला. त्यामुळे गावातील मतभेद विसरून गावातील ऐक्य जपण्यास मदत झाली. ही मारुतीरायाचीच कृपा.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Kaledhon Marutiraya Khatav Taluka

पालखी सोहळा : सामाजिक ऐक्याचे प्रतीक

पांढरीच्या मारुतीरायाचा वर्षातून पाच वेळा आगळा-वेगळा पालखी सोहळा साजरा करण्याची प्रथा आहे. गावात मध्यभागी मारुतीरायाचे लाकडी मंदिर आहे, तर गावच्या पूर्वेकडे पीर बंदे नवाज दर्गा आहे. वर्षातून पाच वेळा निघणारा पालखी ही पीर बंदे नवाज दर्गापर्यंत जाते. तिथे हिंदू-मुस्लिम देवतांच्या भेटी होतात. असा वेगळा सोहळा साजरा होणारे कलेढोण हे खटाव तालुक्यातील एकमेव गाव असावे. त्यामुळेच कलेढोण हे गाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेसाठी ओळखले जाते.

अनोखी ग्रामप्रदक्षिणा...

मारुती देवाच्या पालखीची वर्षातून पाच वेळा ग्रामप्रदक्षिणा निघतात. ही ग्रामप्रदक्षिणा सरळ म्हणजे डावीकडून उजवीकडे निघते. मात्र यात्रा काळात हनुमान जयंती ही ग्रामप्रदक्षिणेची सुरुवात उजवीकडून डावीकडे अशी होते. गावातील पालखी सोहळा संपल्यानंतर मारुतीरायाची पालखी ही पीर बंदे नवाज दर्गापर्यंत पुन्हा भेटावयास जाते. या अनोख्या प्रथेमागील गूढ आजही लोकांच्यात कायम आहे. त्यामुळे कलेढोणच्या मारुतीरायेच्या यात्रेतील पालखी सोहळ्यास वेगळी परंपरा सांगितली जाते.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
BJP MLA : दोन आमदारांनी राजीनामा देताच विधान परिषदेत भाजप आलं अल्पमतात; 'इतकी' झाली संख्या

नवसाला पावणारा व इच्छापूर्ती करणारा मारुतीराया

कलेढोणचा मारुतीराया हा नवसाला पावणारा आहे. आजवर गावातील आबालवृद्धांना मारुतीरायांचे अनुभव आले आहेत. गावच्या शिवारातून येणारा प्रत्येक ग्रामस्थ हा सकाळी मंदिरातील मारुतीरायांसमोर माथा टेकवतो. त्यानंतर आपल्या दिनचर्येस सुरुवात करतो, तर गावातील उभ्या व आडव्या पेठेतील भाविक हे मारुतीरायासमोर नतमस्तक होऊनच आपल्या दुकानास प्रवेश करतात. कोणत्याही शुभ कार्यास, असाध्य कामास, बाहेरगावी जाताना गावातील ग्रामस्थ आपली इच्छा मारुतीरायांजवळ व्यक्त करून गावकुसाबाहेर पडतात. आजवर गावातील व्यापारी, चाकरमाने, ग्रामस्थ, भाविक यांना मारुतीरायाच्या चमत्काराची प्रचिती आल्याचे भाविक सांगतात. इतकेच काय गावात व्यवसायानिमित्त आलेले व्यापारी, व्यावसायिकही मारुतीरायाची चांगली प्रचिती आल्याचे सांगतात.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Hindu Temple : 'या' देशात पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर लिहिलेल्या भारतविरोधी घोषणा

चाकरमान्यांची आस्था व श्रद्धा

कलेढोण व परिसरातील अनेक चाकरमाने हे मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी व्यवसायानिमित्ताने स्थायिक झाले आहेत, तर अनेक गलाई बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. त्यांच्या व्यवसायातील वृद्धी ही मारुतीरायाच्या कृपेमुळेच झाली. त्यांच्या मनात गावच्या पांढरीतील मारुतीदेवाबद्दल प्रचंड आस्था व श्रद्धा आहेत. गावातील होणाऱ्या श्री हनुमान जयंतीस हे भाविक न चुकता हजेरी लावतात. गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात स्वत:हून सहभाग नोंदवितात. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी कलेढोणकर चाकरमाने नेहमी सदैव तयार असतात.

गावची न्यायदेवता

खटावच्या पूर्व भागात वसलेल्या कलेढोणमधील मारुतीराया हा गावाची न्यायदेवता आहे. गावात वाद, तंटा व मतभेद झाल्यास मारुतीरायाला साक्षी ठेवूनच आणा- भाका घेतल्या जातात. त्यामुळे समाजात न्याय देवता म्हणून गावचा पाठीराखा मारुतीराया करीत असतो. कोणतेही चांगले काम सिद्धीस न्यायचे असल्यास जसे मारुतीरायाला नवस बोलले जाते. तसे ग्रामस्थांतील वाद, वैचारिक मतभेद व तंटा सोडविण्यात मारुतीराया धावून येतो.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Kaledhon Marutiraya Khatav Taluka

मारुतीरायाची दैनंदिन पूजा...

श्री मारुती देवाच्या यात्राकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हनुमान यात्रेच्या अगोदरच्या दिवशी रात्री बारास मारुतीरायास अभिषेक घालून जन्मकाळ साजरा केला जातो. रोज सकाळी व संध्याकाळी आठ वाजता देवाची नित्यनेमाने आरती केली जाते. यात्राकाळात जन्मकाळ, भेदिक, गजीनृत्य, वाघ्यामुरळी, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम राबविले जातात.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Laxman Mane : नथुराम गोडसेला शस्त्र पुरवण्यात सावरकरांचा सहभाग; माजी आमदाराचा गंभीर आरोप

जीर्णोद्धाराची गरज...

हजारो भाविकभक्तांचे आराध्य असलेल्या श्री मारुती मंदिराचे आता जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याची गरज आहे. लोकवर्गणी, यात्रा कमिटीच्या मदतीने गावचा मुख्य आराध्य दैवत असलेल्या मारुती मंदिराची नवीन वास्तू उभा करण्यात यावी. ही सर्वसामान्य ग्रामस्थांची इच्छा आहे. त्यासाठी गावप्रमुखांनी एकत्र येऊन जीर्णोद्धाराचा पाया घालावा. गलाईबांधव व चाकरमान्यांच्या रूपाने मारुती देवाची महती आज भारतभर पोचली आहे. त्यामुळे गावच्या वैभवात भर पडावी, यासाठी हे पाऊल टाकणे गरजेचे आहे.

सोंगे काढण्याची परंपरा

खटाव तालुक्यात वेगवेगळ्या धार्मिक परंपरा असलेले कलेढोण हे गाव आहे. गावात महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, यलम्मा देवी मंदिर, खंडोबा मंदिर, पीर बंदे नवाज दर्गा, श्री लक्ष्मी मंदिर यासह सर्वच देवतांची मंदिरे आहेत. वर्षभरात या मंदिरातील देवदेवतांचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, यातील सगळ्यात वेगळी आणि अनोखी यात्रा असते ती मारुती देवाची. मारुती देवाची यात्रा म्हणजे गावातील सर्वात मोठी यात्रा. या यात्रेत सोंगे बैलगाडा मिरवणुकीची परंपरा आहे. ही वेगळी परंपरा असलेले खटाव तालुक्यातील कलेढोण हे एकमेव गाव आहे. सोंगे अर्थात पारंपरिक वेशभूषा करून गावाला मारलेली प्रदक्षिणा होय.

पूर्वी पारंपरिक वेशभूषा सजविलेल्या ट्रॅक्‍टरसमोर वाद्यांची निनादात सोंगे निघतात. त्यात देवदेवतांची वेशभूषा, नावाजलेल्या नाटक व चित्रपटातील भूमिकेची वेशभूषा केली जाते. हे वेशभूषा केलेली पात्रे सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये उभा राहतात. वाद्यांसोबत अथवा लावलेल्या गाण्याच्या तालावर हावभाव करतात. या हावभाव, उत्कृष्ट वेशभूषाकार, सादरीकरणास गावातील यात्रा कमिटीतर्फे मानपान दिला जातो. त्यात अनुक्रमे एक ते पाच असे क्रमांक दिले जातात, तर या सोंगात सहभागी पात्रांना चाकरमाने, गावकरी स्वतंत्र वेगळे बक्षीस देऊन गावातील युवकांचा उत्साह वाढवतात. विशेष म्हणजे या सोंगात स्त्री भूमिकेत युवकांचा सहभाग असतो. या सोंगासाठी युवा मंडळातील कार्यकर्ते वेगवेगळी थीमचा अलीकडे वापर करताना दिसतात.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Narendra Modi : हनुमानजी राक्षसांशी लढले, आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीशी लढू; PM मोदींचा कोणाला इशारा?

आपण केलेल्या सोंगास चांगले बक्षीस कसे मिळेल. यासाठी युवावर्ग प्रयत्नशील असतो. गावात सायंकाळी ही सोंगे ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी तयार होतात. ग्रामप्रदक्षिणा करून मारुतीरायाच्या मंदिराजवळ या सोंगाची सांगता होते. अशा वेगळ्या धाटणीची कलेढोणच्या मारुतीरायाची यात्रा खटाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. सोंगाचा कार्यक्रम म्हणजे यात्रेतील मुख्य आकर्षण होय. ते पाहण्यासाठी कलेढोण व परिसरातील बारा गावे व त्या गावातील वाड्यावस्त्यांवरील भाविक मोठी गर्दी होते. हा कार्यक्रम यात्रेतील पालखीच्या दिवशी आयोजित केला जातो.

नाद बैलगाडा मिरवणुकीचा...

श्री मारुतीरायाची यात्रा आणि बैलगाडा मिरवणूक हे समीकरण आहे. यात्रेतील पहिल्या दिवशी बैलगाडा मिरवणूक काढली जाते. गावगाड्यातील शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैलजोडी. ही बैलजोडी फक्त बेंदूर सणासाठीच सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्याप्रमाणे मारुतीरायाच्या जन्मकाळात म्हणजेच यात्रेतील पहिल्या दिवशी बैलजोडींची मिरवणूक काढली जाते. गावातील विविध वाड्यावस्त्यावरील शेतकरी आपल्या बैलांना या दिवशी सजवतात. कापडी झूल, फुगे, अंगावर छानदार नक्षी, शिंगांना रेबीन बांधून बैलजोडीला आखीव- रेखीव करून सजविले जाते. त्यानंतर गावातील मारुतीरायाच्या मंदिराजवळ सवाद्य बैलजोड्या आणल्या जातात.

या बैलजोडीसमोर पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. बैलजोडीसमोर मालकांसह ग्रामस्थ नाचत या बैलाची मिरवणूक काढतात. प्रत्येक बैलगाडा जोडीसमोर स्वतंत्र वाद्यांची आवडीनुसार सोय केली जाते. या बैलगाड्यांची ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. त्या वेळी बैलांच्या अंगावर मारुतीरायाच्या गुलालाची व चिरमुऱ्यांची उधळण केली जाते. बैलजोड्यांच्या समोरील वाद्यांवर बैलांना नाचविण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. हातात काठी नाचणे, हातात टॉवेल-रुमाल घेऊन बैलांना नाचण्यासाठी प्रवृत्त केले जाते.

Kaledhon Marutiraya Khatav Taluka
Karnataka Election : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 भाजप, एक JDS बंडखोरांसह 42 उमेदवारांना दिलं तिकीट

बैलगाड्यांनी वाढणार शोभा...

बैलगाडा शर्यतीवरील उठवलेल्या बंदीने शेतकऱ्यांच्यात उत्साह वाढला आहे. त्यामुळे गावोगावी पुन्हा बैलांनी विशेषत: खिल्लारी बैलांना मागणी वाढली आहे. कलेढोण परिसरातील शेतकरी हे बैलगाडा मालक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दावणीला पूर्वी एक-दोन बैलजोडी दिसायची. मात्र बैलगाडा शर्यतीमुळे बैलजोड्यांची संख्या पाच-सहा जोड्यांवर जाऊन ती वाढू लागली आहेत. गावातील अनेक बैलगाडा व मालक हे महाराष्ट्रात बैलजोड्यांमुळे प्रसिद्ध झाले आहेत. त्या सर्वांमुळे यंदाच्या यात्रेत पहिल्या दिवशी अनेक बैलगाडे हे मारुतीरायाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यात्रेची शोभा वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com