उदयनराजेंनी साेडविलेला प्रश्न पुन्हा उदभवला; व्यावसायिकांचा पालिकेस सात दिवसांचा अल्टीमेटम

गिरीश चव्हाण
Wednesday, 27 January 2021

चौपाटीच्या जागेवरून सुरू झालेल्या या नव्या वादावर खासदार उदयनराजे कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा : येथील चौपाटीसाठी तात्पुरत्या स्वरूपात गांधी मैदानाची जागा देण्याची मागणी तेथील व्यावसायिकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे नुकतीच केली. चौपाटीसाठीच्या पर्यायी जागेवरील अस्वच्छतेमुळे व्यवसाय करणे अशक्‍य असल्याचे सांगत व्यावसायिकांनी मागणीबाबत निर्णयासाठी पालिकेला तीन फेब्रुवारीपर्यंतचा अल्टीमेटम देत तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
 
राजवाडा येथील चौपाटी पालिकेने त्याच परिसरात असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ स्थलांतरित केली आहे. या ठिकाणच्या जागेचे वाटप 72 जणांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत चिठ्ठीव्दारे करण्यात आले. पर्यायी जागेत काही दिवस व्यवसाय करा, नंतर सर्वांसाठी युनियन क्‍लबच्या पाठीमागे नवीन चौपाटी तयार करण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले होते. पर्यायी जागेतील असुविधांमुळे जागा वाटपानंतर तिथे एकानेही व्यवसाय सुरू केला नाही.
 
येथील समस्यांबाबत संघटनेचे अध्यक्ष शिवाजी निकम, राजू राजपुरे, संदीप माने, विश्‍वास जगताप, नीलम निकम, पूनम खंडागळे, संजय पवार व इतरांनी अभिजित बापट, माधवी कदम यांची भेट घेतली. त्यांनी सध्याच्या जागेत अस्वच्छता असून, लगतच्या ओढ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने व्यवसाय करणे धोक्‍याचे आहे. चौपाटीसाठी युनियन क्‍लबच्या पाठीमागील जागा मिळेपर्यंत गांधी मैदानावर चौपाटी भरविण्यास संमती देण्याची मागणी केली. मागणी करतानाच त्यांनी गांधी मैदानाच्या जागेबाबत पालिकेने तीन फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी त्यांनी दिला. चौपाटीच्या जागेवरून सुरू झालेल्या या नव्या वादावर खासदार उदयनराजे कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा : कुळ कायद्यातील अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा

बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! जवान प्रदीप चव्हाणांच्या चित्रांचे देशभर प्रदर्शन

आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

शिवेंद्रसिंहराजेंचा डाव राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा?

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hawker Demands Land In Union Club For Rajwada Chowpatty Udayanraje Bhosale Satara Marathi News