दुसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज; कऱ्हाडात उपाययोजनांची पूर्वतयारी सुरू

सचिन शिंदे
Saturday, 21 November 2020

दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात तयारी करण्यात आली आहे. तालुक्‍यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दर सोमवारी डेथ ऑडिट केले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी स्पष्ट केले.

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहीत धरून तालुक्‍यात उपाययोजनांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आवश्‍यक त्या उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. दरम्यान, पाणीपुरवठा योजनांच्या कामावरून सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते. उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार उपस्थित होते. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहीत धरून तालुक्‍यात आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली. दरम्यान, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात तयारी करण्यात आली आहे. तालुक्‍यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दर सोमवारी डेथ ऑडिट केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

VIDEO : महाबळेश्वर, पांचगणी पर्यटकांनी बहरले; पर्यटनस्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी

पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यादरम्यान ऍड. शरद पोळ यांनी जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्‍यातील 28 गावांचे प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती दिली. या मिशनअंतर्गत 25 गावांचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, उर्वरित तीन गावांच्या नामंजूर प्रस्तावावर अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तीत काम करणे आवश्‍यक आहे. अनेक जण कामाच्या वेळेत गैरहजर असतात. यापुढे हे खपून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रणव ताटे यांनी दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Health Department Is Gearing Up Against The Backdrop Of The Corona At Karad Satara News