जबाबदारीच्या ओझ्याने कर्मचारी मेटाकुटीला; आरोग्य कर्मचारी, आशा सेविका त्रस्त

जबाबदारीच्या ओझ्याने कर्मचारी मेटाकुटीला; आरोग्य कर्मचारी, आशा सेविका त्रस्त

पाटण (जि. सातारा) : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही योजना जाहीर केली आहे. मात्र, स्वयंसेवकांनी त्याकडे पाठ फिरविल्याने आरोग्य व एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी दैनंदिन कामकाजाबरोबर कोरोनाच्या जबाबदारीच्या ओझ्याने मेटाकुटीला आले आहेत. आरोग्य सेवक-सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांची 24 तास ससेहोलपट चालली आहे. तलाठी, ग्रामसेवक व शिक्षकांवर या कामाची विभागणी करावी, अशी मागणी होत आहे.
 
कोरोना महामारीत आरोग्य विभागासह एकात्मिक बालविकास प्रकल्पातील सेविका व मदतनीस जीव धोक्‍यात घालून सेवा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही योजना जाहीर केली आहे. मात्र, या सर्व्हेत काही ठराविक कर्मचाऱ्यांची हेळसांड होत आहे. या मोहिमेत गावातील स्वयंसेवक व स्वयंसेविका घेण्याचे जाहीर केले असले तरी एकाही गावात कोणीही काम करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

दैनंदिन कामकाजाबरोबर कोरोनाचा सर्व्हे प्रत्येक घरात जाऊन करणे, सर्दी, ताप, खोकला असेल तर ती माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविणे, कोरोना संशयित आढळल्यास त्याची नोंद घेणे, या कोरोना संदर्भातील कामकाजाबरोबर नियमित दैनंदिन कामकाजही पार पाडावे लागत आहे. दिवसभर गावभर हिंडून केलेला सर्व्हे ऑनलाइन पाठवावा लागतो. कोरोनापासून संरक्षणासाठी या कर्मचाऱ्यांना शासनाने कोणतेही साधन दिलेले नाही. त्यामुळे आरोग्य व एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कंत्राटी व मानधनी सेवेतील कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्‍यात आहे. कागदोपत्री कामकाजासाठी तरी शासनाने तलाठी, ग्रामसेवक व शिक्षकांना जबाबदारी देणे गरजेचे आहे. 

गावपातळीवरील स्वयंसेवक गायब 
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे दररोज एका विभागात जाऊन प्रत्येकाच्या घरी कर्मचारी येतात का, याबाबत विचारणा करत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांच्याच तालुक्‍यात एकही गावपातळीवरील स्वयंसेवक व सेविका जबाबदारी घेत नाहीत, याकडे कोणीही लक्ष देत नाही. हे कर्मचारीसुद्धा माणसे आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com