esakal | शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा
sakal

बोलून बातमी शोधा

शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा

मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिके इरडली आहेत. वाऱ्यामुळे भात, ज्वारी कोलमडली आहे. काढणीला आलेली पिके हातची जाणार आहेत असे नवनाथ शिंदे, मोरगिरी (ता. पाटण) यांनी नमूद केले.

शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा

sakal_logo
By
टीम सकाळ

कऱ्हाड /काशीळ ः सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार रात्रभर, तसेच बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली. काढणीला आलेली पिके हातची जाण्याची स्थिती आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने कृष्णा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने जनजीवनही विस्कळित झाले आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. पाचगणीत पावसाचे पाणी दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
 
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. काढणीला आलेली पिके हातची जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऊस, मका, ज्वारी, भात आदी पिके कोलमडून पडली आहेत. शेतात पाणी साचत असल्याने ही पिके कुजू लागली आहेत. मंगळवारी पश्‍चिमेकडील पाटण, सातारा, कऱ्हाड या तालुक्‍यांना पावसाने झोडपून काढले.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

खरिपातील काढणीस आलेली सोयाबीन, भात, भुईमुगासह कडधान्य व तृणधान्याची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्वारीलाही फटका बसला आहे. ज्वारीची कणसे पावसाने काळी पडली आहेत. काही ठिकाणी ज्वारीही भुईसपाट झाली आहे. कोथिंबीर, फ्लॉवर, कोबीमध्येही पाणी साचून नुकसान झाले. फ्लॉवर काळे पडले तर कारले, काकडीही भुईसपाट झाली आहे. पेरूच्या बागांचेही नुकसान झाले आहे. माण, खटावसह कोरेगाव तालुक्‍यात कांद्याची हानी झाली आहे. महाबळेश्वर, जावळी तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीच्या लागवडीही ठप्प आहेत. झालेल्या लागवडीतही पाणी साचल्याने स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्‍यता आहे. कऱ्हाड तालुक्‍यात काही ठिकाणी आडसाली ऊस वाऱ्यामुळे भुईसपाट झाला. पाटण तालुक्‍यात ओढ्यालगतची भाताची पिके वाहून गेली. पावसाने गुऱ्हाळेही बंद ठेवावी लागली. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सावित्रीबाई फुलेंच्या गावाला आठ कोटी द्या, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्‍यांतही पाऊस आहे. तेथील बाजरी, खरीप ज्वारी, मका, कांदा तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. कांद्याचे बी वाया जाण्याची भीती आहे. 

मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिके इरडली आहेत. वाऱ्यामुळे भात, ज्वारी कोलमडली आहे. काढणीला आलेली पिके हातची जाणार आहेत. 
- नवनाथ शिंदे, मोरगिरी (ता. पाटण) 


Edited By : Siddharth Latkar