Video : परतीच्या पावसाचा तडाखा! जावळीत भात शेतीचे नुकसान

संदीप गाडवे/विजय सपकाळ
Sunday, 18 October 2020

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनीही जावळी तालुक्‍यातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अगदी चिखल तुडवत पाहणी करून तातडीने पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी मुल्ला यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ पाहून शेतकरी हळहळले.

केळघर (जि. सातारा) : पावसाने जावळी तालुक्‍यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने काढणीस आलेल्या भातपिकाला देखील माेठा फटका बसला आहे. हळव्या जातीच्या भाताची काढणी सुरू झाली असून, संततधार पावसाने भातशेतीत पाणी साचून राहिल्याने भात काढणी रखडणार आहे. 

पावसामुळे काही ठिकाणी भाताचे पीक आडवे झाले असून, त्यामुळे उत्पन्न कमी येणार आहे. भातासह नाचणी, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड या पिकांचे नुकसान झाले आहे. भात शेतीचे नुकसान झाले आहे. 

जावळीत तहसीलदार थेट बांधावर 

मेढा : जावळी तालुक्‍यात पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीन यांसह पिकांचे मोठे नुकसान झाले. आज प्रभारी तहसीलदार मिलिंद घाटगे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत समितीमधील संबंधित यंत्रणेला दिले.
 
पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मेढा, केळघर, कुसूंबी, बामणोली, करहरसह पश्‍चिम भागात प्रामुख्याने भात पिकासह नाचणी, हायब्रीड, भुईमूग, सोयाबीन पावसाने भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती तहसीलदार घाटगे यांनी शेतात जाऊन घेतली.

मालदनला पावसामुळे घरांची पडझड; सुदैवाने दुर्घटना टळली!

या वेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या सूचनेनुसार जावळीतील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश आज तहसीलदार घाटगे यांनी दिले. 

प्रांताधिकाऱ्यांची चिखल तुडवत पाहणी 

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनीही जावळी तालुक्‍यातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अगदी चिखल तुडवत पाहणी करून तातडीने पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी मुल्ला यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ पाहून शेतकरी हळहळले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Caused Loss Of Rice Crop In Jawali Satara News