सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान; पिकांसह रस्ते पूल गेले वाहून

टीम सकाळ
Thursday, 15 October 2020

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारपासून आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 83.24 इतका पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मिली. मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 83.85, जावली 68.12 . पाटण 69.64, कराड 100.69, कोरेगाव 57.89, खटाव 84.17, माण 84.00, फलटण 94.33, खंडाळा 92.95, वाई 72.43, महाबळेश्वर 122.75 मिली मीटर इतका पाऊस झाला आहे.

मायणी : संततधार पावसाने परिसरातील सर्व ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. शेतांचे बांध भरून वाहू लागले. मोराळे व गोरेगाव येथील येरळा नदीवरील चांद नदीवरील फरशी पुलासह गावोगावच्या ओढ्यावरील फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कोवळी पिके पाण्यात बुडाल्याने आगाप केलेली रब्बीची पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. तरकारी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

माढा तालुक्यातील अनेक रस्ते बंद; कुर्डुवाडीत विक्रमी पाऊस 

कोरेगाव : पावसामुळे शेतातील खरिपाची सुगी उरकण्याला शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्य दिले. मात्र, बुधवारी (ता.14) दिवसभर तालुक्‍यात सर्वदूर पावसाचे थैमान सुरू झाले. शिवारामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतातील सोयाबीनसह खरीप पिकांच्या काढणी, मळणीच्या कामांना पुन्हा "ब्रेक' लागला आहे. परिणामी शेतातील सोयाबीनसह कडधान्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

प्रसूती कळा सुरू झाल्या, दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही, अखेर अर्चनाला नेले बैलगाडीत

भिलार : पाचगणी शहर व परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले हाेते. या पावसाने बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजी चौक ते टेबललॅंड नाक्‍यापर्यंत बाजारपेठेत तीव्र उताराचा रस्ता असून, टेबललॅंडवरून येणारे पाणी मुसळधार पावसात गटारामध्ये मावत नसल्याने ते पूर्णपणे रस्त्यावरून वाहते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील दुकानांमध्ये ते शिरले. पावसाने महालक्ष्मी ऍग्रो व कलारंग शॉपीमध्ये पाणी घुसले आणि दोन्ही दुकाने पूर्णपणे जलमय झाल्याने दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले. महालक्ष्मी ऍग्रोमध्ये खते, बी-बियाणे व इतर औषधे पाण्यात गेल्याने नुकसान झाले आहे.

माणला शेतकऱ्यांची धांदल; कांदा, बाजरीसह घेवड्याचे मोठे नुकसान

फलटण शहर : फलटण शहरासह तालुक्‍यात संततधार झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्‍यात खरिपाची पिके निघाली असली तरी रब्बीच्या पेरण्या वेग घेत असताना पावसाने रब्बी हंगाम वापश्‍याअभावी लांबणार आहे. पावसामुळे उसाच्या क्षेत्रात जाऊन ऊसतोड करता येणार नाही. त्याचबरोबर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ऊस वाहतूकही अडचणीचे ठरणार असल्याने साखर कारखान्याचे गळीत हंगाम ठप्प होणार आहेत. बाणगंगा धरण पूर्ण भरले असून, बाणगंगा नदीवरील सर्व 29 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने बाणगंगा नदीसह तालुक्‍यातील छोटे-मोठे ओढे, नाले, ओहोळ यांनाही पूर आला आहे.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला 

बिजवडी : माण तालुक्यात बुधवारच्या पावसामुळे नागरीकांना मार्च,एप्रिल ,मे महिन्यातल्या लॉकडाऊनमधील परिस्थितीची पुन्हा एकदा आठवण झाली. कोरोना या महाभयंकर रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा बंद पडली होती. गावे निर्मनुष्य झाली होती. रस्ते सुनेसुने पडले होते. सर्वजण आपआपल्या घरात दिवसरात्र बसून होते. अशाच प्रकाराचा अनुभव पावसाच्या संततधारेमुळे दिसून आला. या पावसाचा फटका शेतकरीवर्गांना मोठ्या प्रमाणात बसला. ज्वारीच्या दुबार परेणीचे संकट उभे राहणार आहे. फळबागांनाही याचा फटका बसणार असून तालुक्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती तयार झाली आहे. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Koregoan Phaltan Gondawale Panchgani Satara News