esakal | येरळा नदीचे पाणी दुकानगाळ्यांत घुसले; लाखाेंचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

येरळा नदीचे पाणी दुकानगाळ्यांत घुसले; लाखाेंचे नुकसान

दुकानातील साहित्य बाहेर काढण्याची लगबग नागरिकांची सुरू होती. तसेच पुराच्या पाण्याने नदीपात्रालगतच्या शेतजमिनींचेही नुकसान झाले. 

येरळा नदीचे पाणी दुकानगाळ्यांत घुसले; लाखाेंचे नुकसान

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि.सातारा) : शहरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने चांगलाच हाहाकार माजविला. येरळा नदी शेजारील काही दुकान गाळ्यांत पुराचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची हानी झाली. जुना वडूज-अंबवडे रस्ता खचला असून, स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला.
 
तालुक्‍यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे येरळा नदीची पाणीपातळी दुपारपासून वाढू लागली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले. नदीवर बांधलेले बंधारे पाण्याखाली जावून बंधाऱ्यांवरून पाणी वाहू लागले होते. नदीला पूर आल्याने पाण्याच्या प्रवाहाने दिशा बदलून ते येरळा नदीनजीकच्या काही दुकानगाळे व घरांत घुसले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नगरपंचायतीमधील कर्मचारी प्रसाद जगदाळे यांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. पाण्याच्या वाढत्या दाबामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, भांडी, लाकडी फर्निचर आदी साहित्य अक्षरश: एकमेकांवर ठेवून ते वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : पहा काय सुरु राहणार, काय बंद!

कर सल्लागार अनिल गायकवाड यांच्या कार्यालयाचेही नुकसान झाले. कार्यालयातील कागदपत्रे, लाकडी फर्निचर आदी साहित्यही पाण्याने पूर्णत: भिजले होते. मांडवेचे पोलिस पाटील दत्तात्रय ऊर्फ दाजी पाटील यांच्या रत्नाई ग्रो क्‍लिनिक या खते व बी-बियाणे विक्रीच्या दुकानात पाणी घुसल्याने श्री. पाटील यांचे दहा ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले. दुकानातील खते, बी-बियाणे, औषधे, संगणक, लाकडी फर्निचर, कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. माजिद पठाण यांच्या इंडियन टायर्स या दुकानात पाणी घुसल्याने कॉंप्रेसर आदी साहित्याचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

पक्षसंघटनेसाठी वेळ देणा-यांनाच आता 'राष्ट्रवादी'त संधी

संजय खवळे यांच्या जनलॅक बॅटरी या दुकानातील इन्व्हर्टर, लाकडी फर्निचरचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. राजेश चौधरी यांच्या काचेच्या दुकानात पाणी घुसल्याने नुकसान झाले. याशिवाय रस्त्यानजीक असणाऱ्या एका व्यापारी संकुलातील बेसमेंटच्या गाळ्यात सुमारे चार ते पाच फूट पाणी साचले होते. त्यामध्ये प्रकाश गोडसे यांच्या राहुल ट्रेडर्स या रंग साहित्याच्या दुकानातील सिमेंट, पुट्टी आदी साहित्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. माळवे हायटेक ऍग्रोचे शरद खाडे यांच्या बेसमेंटमधील गोडाऊनमधील खते, बी-बियाणे, औषधांचे तसेच बटाट्याच्या चारचाकी वाहनासाठी बाजूने लावण्यासाठी आणलेले कॅरिंग साहित्य पाण्यात वाहून गेले. माळवे यांचे सुमारे15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय नजीकच्या आणखी काही व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले.

कऱ्हाड पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट; खबऱ्यांचे जाळेही विस्कळित

नदीपात्र तुडुंब भरून वाहू लागल्याने स्मशानभूमीजवळून जाणाऱ्या जुना वडूज-अंबवडे रस्त्याचा काही भाग उखडला होता. स्मशानभूमीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. पहाटेच्या सुमारास सुरू झालेले पुराच्या पाण्याचे हे अकांडतांडव आज सकाळपर्यंत सुरू होते. दुकानातील साहित्य बाहेर काढण्याची लगबग नागरिकांची सुरू होती. तसेच पुराच्या पाण्याने नदीपात्रालगतच्या शेतजमिनींचेही नुकसान झाले. 

Edited By : Siddharth Latkar