भरपावसात वन्यप्राण्यांचा धुडगूस; घेवडा, उडीद, भुईमूगाचे नुकसान

रविकांत बेलोशे
Tuesday, 29 September 2020

सध्या जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांत सोयाबीन, घेवडा, उडीद, भुईमूग काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. परंतु, या कामांना पाऊस डोकेदुखी ठरत असून तो थांबायला तयार नसल्याने पिके काढण्यात मोठा अडसर ठरत आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातच ताडपत्री व कागदाच्या खोपी घातल्या असून त्यामध्ये पावसाची उसंत पाहून पीक काढणी सुरू आहे.

भिलार (जि. सातारा) : पावसामुळे पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली असून एकीकडे कोरोनाच्या धक्‍क्‍याने पिके वाचवण्याची काळजी तर दुसरीकडे डोक्‍यावर भरलेलं आभाळ कोसळण्याची भीती, या चक्रात शेतकरी सापडला आहे. 

सध्या जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांत सोयाबीन, घेवडा, उडीद, भुईमूग काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. परंतु, या कामांना पाऊस डोकेदुखी ठरत असून तो थांबायला तयार नसल्याने पिके काढण्यात मोठा अडसर ठरत आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातच ताडपत्री व कागदाच्या खोपी घातल्या असून त्यामध्ये पावसाची उसंत पाहून पीक काढणी सुरू आहे. शेतात चिखल असल्याने भुईमुगाच्या शेंगा चिखलाने माखल्या जात आहेत. 

बटाट्याच्या उत्पन्नात निम्म्याने घट, शेतकऱ्यांवर कोसळले आर्थिक संकट!

काटवली, बेलोशी, दापवडी, शिंदेवाडी, रुईघर, महू, हातगेघर, खर्शी बारामुरे, सनपाने, घोटेघर, कासवंड, राजपुरी परिसरात भुईमूग, उडीद, सोयाबीन, घेवडा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यंदा पावसाने पिके चांगली असली तरी काढणीदरम्यान पावसाने नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बहुतांशी ठिकाणी वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याने उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. दरम्यान, पिकांच्या काढणीला पाऊस अडचण निर्माण करत असून रानडुकरांनी शेतीचे मोठे नुकसान केल्याने आम्हाला काही पिके अशीच सोडून द्यावी लागणार असल्याचे चंद्रकांत रांजणे (दापवडी) यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains In Jawali Mahabaleshwar taluka Satara News