पावसाच्या मुसळधार वर्षावाने सातारा जिल्हा गारठला!

बाळकृष्ण मधाळे
Wednesday, 14 October 2020

शहरात बुधवारी अक्षरश: पावसाने दिवसभर झोडपून काढल्याने अनेकांची तारांबळ उडाली, तर सकाळपासूनच पावसाने बरसात केल्याने काहींना कामावरती जाण्यास उशीर झाल्याने घरीच राहणे पसंद केले होते. या भरपावसात काहींनी चहाचा अस्वाद घेतला, तर काहींनी भाजक्या शेंगावरती ताव मारला.

सातारा : वादळी पावसाचा सातारा शहरासह जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. महामार्गाकडेच्या सेवा रस्त्यावरही पाणी साचून राहिले होते. त्याचबरोबर शहरातील भाजी मंडईला देखील पावसाचा मोठा फटका बसला. मात्र, बुधवारी झालेल्या पावसात अबालवृध्दांनी मनमुराद आनंद लुटत असल्याचे चित्र होते. या भरपावसात काहींनी चहाचा अस्वाद घेतला, तर काहींनी भाजक्या शेंगावरती ताव मारला. दिवसभर पाऊस सुरु असल्याने काहींनी घरीच राहणे पसंद केले होते.

शहरात बुधवारी अक्षरश: पावसाने दिवसभर झोडपून काढल्याने अनेकांची तारांबळ उडाली, तर सकाळपासूनच पावसाने बरसात केल्याने काहींना कामावरती जाण्यास उशीर झाल्याने घरीच राहणे पसंद केले होते. पाण्याचा निचरा न झाल्याने साचलेले पाणी अनेकांच्या घरात, दुकानात घुसले. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. पावसाच्या उघडीपीनंतर रात्री उशिरापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे काम तेथील नागरिक करत होते. रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांच्या सायलेन्सरमध्येही पावसाचे पाणी गेले. त्यामुळे वाहनेही नादुरुस्त होऊन मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर भाजीपाल्याच्या व पालेभाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, तालुक्‍यातील काही ठिकाणी झाडे पडूनही मोठे नुकसान झाले. परंतु, या जोरदार पडणा-या पावसात अनेकांनी मजा घेत मनमुरादपणे आनंद लुटल्याचेही चित्र दिसत होते.

सातारकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्‍टोबर कालावधीत बहुतेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. तरी अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे. नागरिकांनी मुसळधार पावसात आवश्‍यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्‍ट्रीक वस्तूपासून दूर रहावे, अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains In Satara District Satara News