esakal | माण बाजार समितीचा "कारभारी' कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

माण बाजार समितीचा "कारभारी' कोण?

त्यामुळे उपसचिव का. गो. वळवी यांनी जिल्हा उपनिबंधकांना 20 ऑक्‍टोबर रोजी पत्र पाठवले आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपला असून, मुदतवाढ देणे योग्य नसल्याने प्रशासकामार्फत कारभार करणे योग्य राहील, असे पत्रात नमूद करत शासनाच्या मान्यतेने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यास सुचविले आहे.

माण बाजार समितीचा "कारभारी' कोण?

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा वाढीव कालावधी संपल्यामुळे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक मंडळाने गुरुवारी पदभार स्वीकारताच उच्च न्यायालयाने प्रशासक मंडळास 29 ऑक्‍टोबरपर्यंत पदभार स्वीकारू नये, असा आदेश दिला. प्रशासक मंडळाच्या म्हणण्यानुसार आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर आदेश आला, तर प्रशासक मंडळाने पदभार स्वीकारू नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे, असा विद्यमान संचालक मंडळाचा दावा आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार नक्की कोणाकडे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
 
ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडीत राष्ट्रवादीचे नऊ, कॉंग्रेसचे सहा, तर अनिल देसाई गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीच्या विरोधात कॉंग्रेस व देसाई गट एकत्र आले. समान मते झाल्यामुळे चिठ्ठीवर कॉंग्रेसचे अरुण गोरे हे सभापती झाले, तर राष्ट्रवादीचे दादासाहेब जाधव यांना उपसभापतिपद मिळाले. या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपली आहे. शासनाने बाजार समित्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र, विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याबाबत स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे उपसचिव का. गो. वळवी यांनी जिल्हा उपनिबंधकांना 20 ऑक्‍टोबर रोजी पत्र पाठवले आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपला असून, मुदतवाढ देणे योग्य नसल्याने प्रशासकामार्फत कारभार करणे योग्य राहील, असे पत्रात नमूद करत शासनाच्या मान्यतेने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यास सुचविले आहे.

'कृष्णा"चा ऊस वाहतुकदारांसाठी गाेड निर्णय

त्यानुसार 21 ऑक्‍टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर पुढील अशासकीय व्यक्तींची प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी नियुक्ती करण्यात आली. दादासो चोपडे (लोधवडे) यांची मुख्य प्रशासक म्हणून, तर प्रशासक मंडळाच्या सदस्यपदी सूर्यकांत माने (गोंदवले बुद्रुक), संजय भोसले (बिजवडी), दत्तात्रय जाधव (दहिवडी), संजय जाधव (कुकुडवाड), हणमंत सावंत (दिवड), विजय जगताप (महाबळेश्वरवाडी), योगेश भोसले (बिजवडी), पंढरीनाथ जाधव (दहिवडी), मानसिंग खाडे (पळशी), योगेश घाडगे (शिरवली), विनय पोळ (मार्डी), सूरज पाटील (गोंदवले बुद्रुक) व मधुकर अवघडे (वावरहिरे) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

या प्रशासक मंडळाने गुरुवारी पदभार स्वीकारला. मात्र, या निवडीविरोधात विद्यमान संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही प्रशासक मंडळाने 29 ऑक्‍टोबरपर्यंत पदभार घेऊ नये, असा आदेश दिला आहे. 

आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार आम्ही पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर उच्च न्यायालयाचा आदेश आला आहे. 

- दादासो चोपडे, मुख्य प्रशासक 

प्रशासक मंडळाला पदभार स्वीकारण्याचा अधिकार नसून अजूनही विद्यमान संचालक मंडळाकडेच कारभार आहे. 

- अरुण गोरे, सभापती 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासक मंडळाने पदभार स्वीकारू नये, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. 

- मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top