चेला कारखान्याचा चेअरमन असल्याने हिंदकेसरी खंचनाळे अजिंक्यता-यावर नेहमी यायचे

सुनील शेडगे
Monday, 14 December 2020

तरुण कुस्तीगीर घडविण्याचा त्यांचा ध्यास कायम होता. ते स्वतः पहाटे चारला उठत. मेहनत करत. जोर-बैठका काढत. स्वतः आखाड्यात उतरत.

नागठाणे (जि. सातारा) : श्रीपती अण्णा हे कुस्ती क्षेत्रातील चैतन्य होते. त्यांचा बाणा करारी होता. शिस्त करडी होती. कुस्ती हा शब्द त्यांच्यासाठी श्वास होता. त्यासाठीच ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले, अशा शब्दांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविणाऱ्या रामभाऊ जगदाळे यांनी आपल्या स्मृती जागविल्या.

रामभाऊ जगदाळे हे सातारा तालुक्यातील नांदगाव इथले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. उत्तम कुस्तीगीर म्हणूनही त्यांचा लोैकिक होता. देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोल्हापूरला कुस्तीचे धडे गिरविले. आज (साेमवार) पहाटे या महान पहिलवानाचे निधन झाले. त्यांचा सहवास लाभलेले क्षण रामभाऊ जगदाळे यांनी उलगडले.

सन 1971 ते 1973 या काळात मी कुस्तीसाठी कोल्हापूरातील शाहूपुरी तालमीत होतो. श्रीपती आण्णा हे तिथे वस्ताद होते. आण्णांची कुस्ती तेव्हा सुटली होती. मात्र तरुण कुस्तीगीर घडविण्याचा त्यांचा ध्यास कायम होता. ते स्वतः पहाटे चारला उठत. मेहनत करत. जोर-बैठका काढत. स्वतः आखाड्यात उतरत. बेशिस्तपणा त्यांना खपत नसे." सायंकाळी ते तिथल्या कट्ट्यावर बसून गप्पा मारत. तरुण कुस्तीगिरांना मार्गदर्शन करत. 

मी दरवर्षी त्यांना भेटायला कोल्हापूरला जात. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्यतारा  कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित आखाड्यास ते चार वेळा उपस्थित राहिले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना नीट चालता येत नसे. तरीही 'माझा चेला कारखान्याचा चेअरमन आहे. त्याच्यासाठी मला हजर राहिलेच पाहीजे' असेही ते म्हणत. त्यामुळे कारखान्याचे निमंत्रण ते कधीही डावलत नसत, असेही श्री. जगदाळे यांनी नमूद केले.

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

आण्णा हे कुस्तीचे वैभव...

अंगापूर येथील 'एनआयएस' कुस्ती प्रशिक्षक जितेंद्र कणसे यांनीही खंचनाळे यांच्या आठवणी शब्दबद्ध केल्या. रामभाऊ जगदाळे, उत्तमराव नावडकर, पी. डी. कणसे यांच्यासोबत त्यांना कोल्हापूरला जाऊन भेटण्याचा योग आला. त्या वेळी त्यांचा अस्सल, रांगडा स्वभाव भावल्याचे जितेंद्र कणसे यांनी सांगितले. श्रीपती आण्णा हे कुस्तीचे वैभव होते, असेही त्यांनी नमूद केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे उद्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hind Kesari Shripati Khanchnale Visits Satara Trending News