कुळवाची पास डोक्यात घालून हॉटेल कामगाराची निर्घृण हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : कुळवाची पास डोक्यात घालून हॉटेल कामगाराची निर्घृण हत्या

Pune : कुळवाची पास डोक्यात घालून हॉटेल कामगाराची निर्घृण हत्या

सिंहगड : दैनंदिन काम करताना होणाऱ्या किरकोळ वादावादीतून एका हॉटेल कामगाराने दुसऱ्या कामगाराची डोक्यात कुळवाची लोखंडी पास घालून निर्घृण हत्या केली आहे. रतन मंडी (वय 34, मुळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे तर याप्रकरणी हवेली पोलीसांनी समीर बिश्वास (वय 27, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत हॉटेल शौर्य येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

मृत रतन मंडी व समीर बिश्वास या हॉटेल कामगारांमध्ये दैनंदिन कामावरुन किरकोळ बाचाबाची होत होती. तसेच आर्थिक कारणांवरूनही त्यांच्या सतत भांडणे होत होती. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने दारू पिल्यानंतर त्यांच्यात भांडणे व्हायची. मध्यरात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास काम आवरून रतन मंडी झोपलेला असताना समीर बिश्वास याने कुळवाच्या लोखंडी पासेने मंडी याच्या तोंडावर व डोक्यावर घाव घातले. त्यात रतन मंडी याचा जागीच मृत्यू झाला आहे.

समीर बिश्वास याने स्वतः जाऊन पहाटे ही माहिती हॉटेल मालकाला दिली. हॉटेल मालकाने तात्काळ याबाबत हवेली पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस उपनिरीक्षक शितल ठेंबे, सहाय्यक फौजदार सुभाष गिरे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक गणेश धनवे, दिपक गायकवाड, संतोष भापकर, पोलीस कॉन्स्टेबल महेश कांबळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व समीर बिश्वास याला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

"कामाच्या वादातून व इतर काही कारणांनी एका हॉटेल कामगाराने दुसऱ्या कामगाराची हत्या केली आहे. संबंधित संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण. याबाबत अधिक तपास करत आहोत.