HSC Result 2024 : भलामोठा डोंगर चढून केली पायपीट अन् लेकीसोबत मिळवलं बारावीच्या परीक्षेत यश

पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांचा शिक्षणप्रवास थांबला. पुढे लग्न, संसार, शेती या चक्रातून उसंत लाभली नाही.
HSC Result 2024
HSC Result 2024Sakal

नागठाणे/कास : प्रत्येक जण हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्याच्या शिकण्याला ना वयाचे बंधन असते, ना वेळेकाळेचे. त्याचीच प्रचिती देताना अत्यंत दुर्गम भागातील, शेतीत राबणाऱ्या एका मातेने आपल्या मुलीसह बारावीची परीक्षा दिली. इतकेच काय तब्बल ३० वर्षांनी यशाची चव चाखण्याची किमयाही साधली.

ही कहाणी पुष्पा भरत साळुंखे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची. तितकीच ती अफाट जिद्दीची अन् अथक मेहनतीची. जावळी तालुक्यातील देवाची शेंबडी हे त्यांचे गाव. १९९६ मध्ये त्यांनी माहेरगावातील बामणोलीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून दहावीचे शिक्षण पुरे केले.

पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांचा शिक्षणप्रवास थांबला. पुढे लग्न, संसार, शेती या चक्रातून उसंत लाभली नाही. अशातच मुलांच्या आग्रहावरून दोन वर्षांपूर्वी त्यांनी साताऱ्यातील कला, वाणिज्य महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला.

त्यानंतर बारावीची परीक्षाही दिली. त्यांची कन्या सुप्रिया हीदेखील मुंबईत बारावीला शिकत होती. या मायलेकी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे पती भरत, मुलगा स्वप्नील, कन्या सुप्रिया, समीक्षा, बंधू दिनेश अन् सचिन सिंदकर यांचे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. शिक्षिका गुणकली कुलकर्णी, अंगणवाडी सेविका भारती साळुंखे, आकाश शिंदे यांचे सहकार्यही मोलाचे ठरले.

आईच्या यशाचा अभिमान वाटतो. तिची जिद्द, आत्मविश्वास या गोष्टींतूनही खूपकाही शिकण्यासारखे आहे. आता तिने पुढील पदवीचे शिक्षण पूर्ण करावे, अशी आम्हा मुलांची इच्छा आहे.

- सुप्रिया साळुंखे, मुलगी

एसटी गाठण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट करायला लागायची. भलामोठा डोंगर चढायला लागायचा. परीक्षेला नातेवाइकांकडे मुक्काम करावा लागला. त्यातून कमाविलेल्या यशाचा आनंद वाटतो.

- पुष्पा साळुंखे

दुर्गम भागातील एका महिलेने कितीतरी अडचणींवर मात करत मिळविलेले हे यश प्रेरणादायी आहे. त्यातून ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलेल.

- दीपक भुजबळ, मुख्याध्यापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com