
सातारा : शंभर टक्के एसटी कर्मचारी हजर
सातारा - गेल्या दोन वर्षांत कोरोना, कर्मचाऱ्यांचा संप अशा घटनांमुळे एसटीला अवकळा आली होती. मात्र, आता परिस्थिती बदलू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर तसेच गेल्या सहा महिन्यांपासून एसटी संपातील जिल्ह्यातील सहभागी कर्मचारी १०० टक्के कामावर हजर झाल्याने बस व प्रवाशांनी जिल्ह्यातील बस स्थानके फुलून गेल्याचे चित्र आहे. एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने उत्पन्नातही वाढ होत असून हळूहळू एसटी पूर्वपदावर येत आहे. मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर २०२१ मध्ये फेब्रुवारीनंतर लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर एसटी सुरू झाली. परंतु, कोरोनाच्या भीतीने सुमारे ८० टक्के प्रवाशांनी पाठ फिरविल्याने एसटीला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. त्यानंतर जून महिन्यानंतर एसटीची चाके रस्त्यावर येत असल्याची स्थिती असतानाच नोव्हेंबर महिन्यात अचानक राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला. या संपातून तोडगा काढत कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. मात्र, काही संघटनांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यावर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात सक्त ताकीद देऊन हजर होण्यास सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ११ आगारांतील १०० टक्के कर्मचारी हजर झाले आहेत. सद्य:स्थितीत आता जिल्ह्यातून राज्यभरात एसटीच्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्याने उत्पन्नातही वाढ होत आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या लालपरीसह इतर ठिकाणी शिवशाही, हिरकणी या बसही जिल्ह्यातील विविध आगारांतून सुरू झाल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून एसटीच्या फेऱ्या वाढल्या असून दिवसाला सरासरी सतराशेहून अधिक फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अकरा आगारांत तीन हजार ४१० कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
दिवसाला ६०० हून अधिक फेऱ्या
गेल्या १५ दिवसांपासून एसटीचे संचलन वाढले आहे. जिल्ह्यातील ११ आगारांत ४५० हून जादा बस संचलनात आल्या असून सद्य:स्थितीत एकूण ६०० हून अधिक फेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यांतर्गत व लांब पल्ल्यांच्या बसची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
ऑनलाइन आरक्षण सुरू
संप काळात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने लांब पल्ल्यांच्या एसटीचे आरक्षण बंद ठेवण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत सर्वच कर्मचारी हजर झाल्याने सातारा-स्वारगेटसह इतर काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Web Title: Hundred Percent St Employe Present In Satara Division
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..