Satara : शेकडो वर्षांची झाडे संपुष्टात येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : शेकडो वर्षांची झाडे संपुष्टात येणार

पुसेगाव : राज्यमार्ग क्र. १४६ वरील पुसेगाव-वडूज दरम्यान रस्‍त्‍याच्या कडेची शेकडो वर्षे जुनी वडाची झाडे रुंदीकरण व मजबुतीकरणात संपुष्टात येणार आहेत. संबंधित विभागाने प्रत्यारोपण करून ही झाडे वाचवावीत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.

नैसर्गिक वृक्षसंपदेने नटलेल्या या राज्य मार्गावर दुतर्फा वडाच्या झाडांची अभेद्य तटबंदी आहे, तसेच या व्यतिरिक्त पिंपळ, आंबा, जांभळ, पिंपरण, लिंब अशा अनेकविध वृक्षांची विपुलता आहे. यामुळे या मार्गावर शीतल हवेच्या झोतासह सावलीत प्रवास करताना प्रत्येक वाहनचालक व प्रवाशांना आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळून प्रवास सुखाचा होतो.

मात्र, आता रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामासाठी दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या वृक्षांच्या साखळीवर कुऱ्हाड पडणार आहे. शेकडो वृक्षांची या रुंदीकरणासाठी कत्तल होणार आहे. यातील अनेक वृक्ष शतकापेक्षा जास्त जुन्या काळातील आहेत. त्यामुळे एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार आहे. याबाबत पर्यावरण तज्ज्ञांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, या झाडांना वाचविण्यासाठी त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण करावे, अशी मागणी होत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या रस्ते विकास धोरणानुसार रस्ते रुंदीकरणासारख्या कामांमुळे भविष्यात गतिमान अशी दळणवळण व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी भविष्याचा विचार करून रस्ते, महामार्ग रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. होणारी वृक्षतोड रीतसर परवानगी घेऊन केली जात आहे. मात्र वनांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही तर खरी काळाची गरज आहे. त्यामुळे जी झाडे तोडायचीच असतील त्या झाडांचं आयुष्य आणि त्यांचा उपयोग या बाबींचा विचार करूनच निर्णय होणे गरजेचे आहे.

या राज्यमार्गावर येणाऱ्या गावातील लोकांचे राहणीमान सुधारावे, औद्योगिक विकासाला पूरक अशा सोयी-सुविधा निर्माण व्हाव्यात, असे शासनाचे धोरण आहे. वेगवान दळणवळणासाठी हे योग्यच आहे. मात्र, या राज्यमार्गावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे शीतल सावली हरवणार आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार विकास साधताना जैवसाखळी उद्ध्वस्त होऊन वनसंपदेला हानी पोचणार आहे. कारण एकदा जैवसाखळी उद्ध्वस्त झाली, तर ती पूर्वपदावर येण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. याबाबीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याचा योग्य तो विचार करून या झाडांचे प्रत्यारोपण करून त्यांचे उत्तमरीत्या संगोपन करावे, अशी मागणी होत आहे.

रस्ते किंवा इतर प्रकारचे आधुनिकीकरण करत असताना निसर्गाचे संवर्धन झालेच पाहिजे. यासाठी प्रत्यारोपणाचे तंत्रज्ञान वापरून या झाडांना वाचविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. कारण ते आपल्या अस्तित्वासाठी खूप गरजेचे आहेत.

- जीवन इंगळे, अध्यक्ष सर्वोदय सामाजिक संस्था