Lockdown Effect : शिकाऱ्यांनी टिपले 79 वन्यजीव; वन गुन्ह्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ

संजय शिंदे t@ssanjaysakaal
Monday, 25 January 2021

वन विभागाने 2019 मध्ये जंगलात लाकूडतोड, लाकडाच्या मोळ्या, वन जमिनीत अतिक्रमण, विनापरवाना लाकूड, कोळसा वाहतूक, वणवा, चराई, सॉमिल, वन जमिनीत उत्खनन, विनापरवाना वन विभागात प्रवेश असे 656 वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. 2020 मध्ये त्यात वाढ झाली असून, 715 गुन्हे दाखल केले आहेत.

सातारा ः लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. वर्षभरात 79 प्राण्यांच्या शिकारी झाल्या आहेत. वन गुन्ह्यांतही वाढ झाली असून, 715 गुन्हे नोंद झाले आहेत.
 
वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे वनप्रेमी प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे वन्यजिवांना टिपण्यासाठी शिकारीही आघाडीवर असल्याचे दिसून येते. पश्‍चिम घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यजिवांची शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाउनच्या काळात वन्यप्राण्यांच्या शिकारी वाढल्या असून, गेल्यावर्षी वन विभागाने 79 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.

भाविकांनाे! घरबसल्या पहा श्री खंडोबा- म्हाळसाचा विवाह सोहळा

त्यामध्ये सातारा तालुक्‍यात रानडुक्कर, खवले मांजर, कासव, पोपट, जंगली मांजरप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पाटण तालुक्‍यात रानडुक्कर, मोर व नाग पकडल्याप्रकरणी, महाबळेश्‍वर तालुक्‍यात बिबट्या, कलिंदर, भेकराच्या शिकारप्रकरणी, वाई तालुक्‍यात साळींदर व तरसाच्या शिकारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खंडाळ्यात वानर, कोरेगावमध्ये कासव व फलटण तालुक्‍यामध्ये ससा आदी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाने वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांच्या पुढाकारातून धडक कारवाया केल्या आहेत. या पथकाने वेळे येथे सापळा रचून जिवंत खवले मांजर पकडले. घोरपडीच्या शिकारप्रकरणी पिंपरी (ता. कोरेगाव) येथील तिघांवर व्हॉट्‌सऍपवर छायाचित्राच्या आधारे भरारी पथकाने कारवाई केली. वन विभागाने 2019 मध्ये जंगलात लाकूडतोड, लाकडाच्या मोळ्या, वन जमिनीत अतिक्रमण, विनापरवाना लाकूड, कोळसा वाहतूक, वणवा, चराई, सॉमिल, वन जमिनीत उत्खनन, विनापरवाना वन विभागात प्रवेश असे 656 वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. 2020 मध्ये त्यात वाढ झाली असून, 715 गुन्हे दाखल केले आहेत. 

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असून, त्यानुसार तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास शिकारीवर नियंत्रण मिळवता येईल. शिकारीबाबत कोणाला माहिती असल्यास 1926 या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक यांनी केले आहे.

गुन्ह्याचा प्रकार 2019 2020
जंगलात लाकूडतोड 88 160
वन जमिनीत अतिक्रमण 51 70
अवैध लाकूड वाहतूक 19 40
वनवणवा 320 187
वन्यजीव 53 79
चराई 69 125
उत्खनन, सॉमिल, इतर 56 54

दैव बलवत्तर म्हणूनच बचावलो! सातारा- सोलापूर बस चालकाने सांगितली दगडफेकीची थरारक कथा

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांनी वक्‍तृत्वाची तलवार अखेरपर्यंत तळपत ठेवली : शंभूराज देसाई

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunters Hurt Seventy Nine Wild Animals During Lockdown Satara Marathi News