
सातारा: गणेशोत्सवात दुधाला मागणी वाढते. विशेषत: गायीच्या दुधाला अधिक मागणी असते. त्यातच सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला मागणी वाढू लागल्याने खासगी दूध संस्थांनी दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी काळात लागून येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर हे दर आणखी वाढून ३८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात दरवाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सुखकर्त्याच्या आगमनाने कृपादृष्टी झाल्याची भावना निर्माण झाली आहे.