Video : शिवेंद्रसिंहराजेंनी स्ववास्तूत उभारले कोविड सेंटर

उमेश बांबरे
Tuesday, 15 September 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्व काही प्रशासनावर ढकलून चालणार नसल्यानेच  काेविड सेंटर उभारल्याचे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि वेदांतिकाराजे भाेसले यांनी व्यक्त केले.
 

सातारा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्यासाठी स्वखर्चातून आमच्या स्ववास्तूत कोविड सेंटर उभारले आहे. जिल्हा रुग्णालय हे सेंटर चालविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांना येथे मोफत उपचार होणार आहेत, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
 
आमदार भोसले यांनी त्यांच्या स्वमालकीच्या पुष्कर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या कोविड सेंटरचे लोकार्पण साेमवारी (ता.14) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी वेदांतिकाराजे भोसले, अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, नायब तहसीलदार व आजी- माजी नगरसेवक उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केली भूमिका
 
या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोविड सेंटरची पाहणी करून येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती शिवेंद्रसिंहराजे व वेदांतिकराजे भोसले यांच्याकडून घेतली. जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून हे कोविड सेंटर चालविले जाणार आहे. या वेळी वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, ""कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात लोकांना अन्नधान्याची गरज होती. त्या वेळी आम्ही गरजूंना अन्नधान्याची मदत केली. आता जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्वांनी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, नागरिकांनी शक्‍य असेल त्यांनी पुढे येऊन मदत करायला हवी. आम्ही येथे स्वखर्चातून 80 बेडचे कोविड सेंटर उभे केले आहे. येथे जिल्ह्यातील कोणीही रुग्ण मोफत उपचार घेऊ शकणार आहे.''

सत्तेत नसतानाही करुन दाखवलं, आता पुढची रणनीतीही ठरली : शिवेंद्रसिंहराजे
 
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात बाधित रुग्णांना बेड मिळत नाहीत; पण मंगल कार्यालयात 80 बेडचे हॉस्पिटल सुरू केले आहे. यानिमित्ताने 80 रुग्णांची या कोविड सेंटरमध्ये सुविधा मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्व काही प्रशासनावर ढकलून चालणार नाही.''

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inaguration Of Covid 19 Center Vedantikaraje Shivendrasinghraje Bhosale Satara News