बैलगाडी शर्यतींत हाणामारीचे प्रकार, नंबरवरून दहशत माजवण्याचा प्रयत्न I Patan Taluka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bullock Cart Race

शर्यतीच्या नावाखाली संयोजक आणि गावकऱ्यांत वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

बैलगाडी शर्यतींत हाणामारीचे प्रकार, नंबरवरून दहशत माजवण्याचा प्रयत्न

मल्हारपेठ (सातारा) : शासकीय नियमांची कागदोपत्री अंमलबजावणी करून सुरू असलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये (Bullock Cart Race) गाडीमालक आणि समर्थकांत दंगा व हाणामारीचे प्रकार वाढत आहेत. अनेक शर्यतींमध्ये नंबरवरून दहशत माजवण्याच्या प्रकारामुळे न्यायालयाने घातलेल्या अटींचे काटेकोर पालन होण्याची मागणी होत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडी शर्यतीचा निर्णय होत नव्हता. मात्र, अनेक याचिकाकर्ते, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेक वेळा आवाज उठवून बैलगाडी शर्यत सुरू करण्यास शासनास भाग पाडले. शर्यत बंदीचा निर्णय उठवला आणि राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या शर्यती शांततेत पार पडल्या. मात्र, पाटण तालुक्यातील (Patan Taluka) शेडगेवाडी, नाटोशी, लुगडेवाडी, आडुळ, पाटण (काळोली), माथणेवाडी, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे या गावांत भांडणे, वादावादी झाली. प्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप करून गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील ओगलेवाडी, उंब्रज, वहागाव, रेठरे या ठिकाणच्या शर्यती पारदर्शक झाल्या. मोठ्या एलईडी स्क्रिनवर शर्यतींचे निकाल देण्यात आले. त्यामुळे मैदान शांततेत पार पडले.

हेही वाचा: चिनी सैन्यात हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती, गुप्तचर अहवालातून माहिती समोर

दरम्यान, काही ठिकाणी गाडी मालकांच्यात हाणामारीचे प्रकार घडलेल्या ठिकाणी शर्यतीचे निकालही झाले नाहीत. त्यामुळेच वादावादी आणि भांडणाचे प्रकार घडले. या शर्यती सुरू राहाव्यात असे वाटत असेल तर बैलगाडी मालकांस शासकीय परवाने दिल्याशिवाय शर्यतीमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, असा पवित्रा अनेक गावांतील संयोजन समितीने घेतला आहे. शर्यतीत पाहुण्यांच्या नावाखाली गाडी नोंदवण्यामुळे संयोजक आणि गावकऱ्यांतही वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यासाठी गाडी मालकांना शासकीय परवाने बंधनकारक करण्याची मागणी अनेक शर्यतप्रेमींतून होत आहे.

गाडी मालकांत शर्यतीवेळी होत असलेली वादावादी, हाणामारी निंदनीय आहे. अशा प्रकारांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार आहे. गाडी मालकांच्यात जर असे हाणामारीचे प्रकार घडून स्थानिक संयोजन समितीच्या निर्णयाची पायमल्ली होऊ लागली तर शर्यती होण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे शासनाने अशा शर्यतीत सहभागी होणाऱ्या गाडीमालकांना नियमावलीसह कायदेशीर बाबींचाही परवाना बंधनकारक करावा.

- विकास शेडगे, अध्यक्ष, शर्यत समिती, शेडगेवाडी-विहे

हेही वाचा: गुजरात सीमेवर पाकिस्तानी बोट सापडल्यानं खळबळ, बीएसएफनं घेतली तात्काळ दखल

बैलगाडी शर्यतीमध्ये घडणारे प्रकार घातक आहेत. बैलगाडी मालकांकडून असे प्रकार घडत असतील तर ते बरोबर नाही. अनुचित प्रकार घडला तर गुन्हे दाखल होणारच. संयोजन समितीने ठरलेले बक्षीस दिले पाहिजे. ते होत नाही. यापुढे शर्यती पुढे चालू राहाव्यात असे वाटत असेल तर असे प्रकार थांबले पाहिजेत.

- प्रकाश पवार, गाडीमालक, दाढोली

Web Title: Incidents Of Fighting In Bullock Cart Race In Patan Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top