माणुसकी हरवली! चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट

माणुसकी हरवली! चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट

बिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत. कोरोनाच्या भीतीने गावी आलेले हे चाकरमानी सात ते आठ महिन्यानंतर पुन्हा कामासाठी मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांकडे जाताना दिसून येत आहेत. अगोदरच लॉकडाउनमुळे प्रचंड नुकसान झाले असताना त्यामध्ये भर म्हणून खासगी वाहनधारक वाढीव दर आकारून प्रवाशांची आर्थिक लुटमार करत आहेत. खासगी बस, वाहने, ट्रॅव्हल्सधारकांनी प्रवाशांची अडवणूक न करता वाढीव दर न लावता नेहमीचे दर लावावेत, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. 

कोरोनाची महामारी अजून संपलेली नसली तरी जवळपास सर्व अनलॉक झाल्याने चाकरमान्यांनी पुन्हा मुंबईला जाण्याचा निर्धार करून तशा हालचाली सुरू केल्या. मुंबईकरांनी जाताना पुन्हा नेहमीप्रमाणे खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. मात्र, या खासगी वाहनांनी कोरोनाच्या या महामारीतही प्रवासी वर्ग हे आपले दैवत आहे, माणुसकी विसरून केवळ धंदाच करायचा, हाच स्वार्थी हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रवासी वर्गाची आर्थिक लूटमार केली. लॉकडाउन काळात ठिक आहे म्हणता येईल की वाहने मिळत नव्हती, रिस्क होती त्यामुळे वाढीव दर घेतले. परंतु, आता तर सर्व ठिक चालले असतानाही प्रवासी वर्गाची लूटमार का करतात? त्यांनी थोडीफार माणुसकी दाखवत पहिल्यासारखे प्रवासभाडे आकारून चाकरमान्यांना मुंबईला सोडणे गरजेचे आहे. या प्रवासी वर्गाच्या मागणीचा खासगी वाहने, ट्रॅव्हल्सधारकांनी विचार करून लवकरात लवकर दर कमी करून प्रवासी वर्गाची लूटमार थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

मुंबईला येण्या-जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सधारक लॉकडाउनच्या आधी प्रतिव्यक्तीस 350 ते 500 रुपये दर आकारत होते. परंतु, लॉकडाउन काळात एका सीटला 2000 ते 2500 रुपये घेत होते. आत्ता बऱ्यापैकी सर्व गोष्टी पूर्ववत झाल्या असूनदेखील आता ट्रॅव्हल्सधारक 1000 रुपये दर आकारत आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गाला हे परवडणारे नाही. खासगी वाहनधारक ही लॉकडाउन काळात दुप्पट भाडे सांगून प्रवाशांना लुटत होते. आताही त्यांनी पहिल्यासारखे दर लावण्याची गरज आहे. हे दर पूर्ववत व्हावेत, अशी सर्व प्रवाशांची मागणी आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी प्रवासीवर्ग अजूनही एसटीने प्रवास करण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही. त्याचाच फायदा हे खासगी ट्रॅव्हल्स व वाहने घेताना दिसून येत आहेत.

मुंबईला येण्या-जाण्यासाठी खासगी वाहने बरी पडतात. ही वाहने शहरात विविध ठिकाणी अगदी जागेपर्यंत पोचतात. त्यामुळे येणे-जाणे सोयीचे ठरते. मात्र, लॉकडाउनपासून या खासगी वाहनांनी भरमसाट दर आकारले आहेत. आधीच लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. आपलेच लोक पोट भरण्यासाठी पुन्हा शहराकडे चालले आहेत. त्यांना नेहमीसारखे दर लावून सहकार्य करावे. 
-शरद दडस, प्रवासी, दडसवाडा (वडगाव, ता. माण) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com