सातारा : कोरोनानंतर रोजगारनिर्मितीत वाढ; ९,७८४ युवकांना नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवक, युवती बेरोजगार झाले. त्यांना कौशल्य विकास योजनेचा आधार मिळाला.

Jobs : सातारा : कोरोनानंतर रोजगारनिर्मितीत वाढ; ९,७८४ युवकांना नोकरी

सातारा - कोरोनानंतर जिल्ह्यात तरुणांना रोजगाराच्या संधीत वाढ झाली आहे. आतापर्यंत ९ हजार ७८४ युवकांना नोकरी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात रोजगार व उद्योजकता विभागाकडे १८ हजार ९०१ उमेदवारांनी नोकरी, रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. तर कौशल्य विकास योजनेतून दोन हजार युवकांनी प्रशिक्षण घेतले होते. त्यापैकी १ हजार १८७ उमेदवारांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढत असल्या तरी त्या तुलनेत रोजगार मागणाऱ्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवक, युवती बेरोजगार झाले. त्यांना कौशल्य विकास योजनेचा आधार मिळाला. कोरोनाचे लॉकडाउन उठल्यानंतर गेल्या वर्षभरात दोन हजार युवकांनी रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून घेतले होते. त्यापैकी १ हजार १८७ उमेदवारांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देवून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासोबतच युवकांच्या नावीन्‍यपूर्ण नवसंकल्पानांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे याचा युवकांना फायदा होत आहे. ते स्वयंरोजगाराची कास धरत आहेत. यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, किमान कौशल्य विकास कार्यक्रम आदी योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. यातून नवीन उद्योजक घडविण्याचे काम होत आहे. स्टार्टअप उद्योगालाही चालना मिळत आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावे घेतले जातात. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात नऊ रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यातून ३९२ युवकांना रोजगार मिळाला आहे. विविध मार्गाने नोकरी मिळालेल्या युवकांची संख्या ९ हजार ७८४ आहे. तर, दुसरीकडे नोकरी किंवा रोजगार मिळावा, यासाठी या विभागाकडे नोंदणी करणाऱ्या युवकांचे प्रमाण मोठे आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत १८ हजार ९०१ युवकांनी या विभागाच्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. नोंदणी करणाऱ्या युवकांची संख्या एक लाख ६९ हजार ०७३ इतकी आहे.

युवकांचा कल स्टार्टअपकडे...

नवउद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्‍यता यात्रेचे आयोजन केले होते. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्टार्टअप उद्योग सुरू करण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. त्यातून जिल्ह्यात रोजगाराची संधी वाढली आहे.