esakal | एकंबेत डबल सेंच्युरी; घरोघरी बाधित सापडल्याने गाव बनले 'हॉटस्पॉट'
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus

एकंबेत डबल सेंच्युरी; घरोघरी बाधित सापडल्याने गाव बनले 'हॉटस्पॉट'

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : मास्कचा योग्य प्रकारे वापर न करण्याबरोबरच कोरोनासंदर्भातील विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांकडून केले जात नसल्यामुळेच एकंबे (ता. कोरेगाव) गाव कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

कोरेगाव तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एकंबे गावाची लोकसंख्या तीन ते साडेतीन हजारांच्या आसपास आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तडवळे संमत कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत असलेल्या एकंबे गावामध्ये आरोग्य उपकेंद्र देखील आहे. या पार्श्वभूमीवर या गावामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाग्रस्तांचे प्रमाण वाढू लागल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभागाने गावामध्ये सर्वेक्षण, जनजागृती व तपासणीची मोहीम हाती घेतली. तपासणीच्या पहिल्या कॅंपमध्ये १७९ जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुसऱ्या कॅंपमध्ये १०३ जण, तर तिसऱ्या कॅंपमध्ये ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वयस्करांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

आता दंडुक्याचीच गरज! जिल्ह्यात टाळेबंदीतही नागरिक रस्त्यावर

या व्यतिरिक्त काही जणांना सौम्य लक्षणे आहेत, तर बहुतांश जणांना लक्षणेच दिसून येत नाहीत. उपचारांची गरज असलेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. गावामध्ये संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था नसल्यामुळे उर्वरितांना गृह विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. दरम्यान, तपासणीपासून बाजूला राहिलेल्या व लक्षणे नसलेल्या हेल्दी कॅरियरमार्फत संसर्ग पसरण्याचा आणि त्याचा धोका प्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना विशेषतः विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या वयस्करांना अधिक आहे. ताज्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत दोघांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गावामध्ये सर्वेक्षण व जनजागृती करण्यावर विशेष भर दिला आहे. गावामध्ये आरोग्य उपकेंद्र असले, तरी या ठिकाणी आरोग्य सेवक हे पद रिक्त आहे. त्यामुळे या ठिकाणचा भार 'डेप्युटेशन'वरील कर्मचारीच वाहत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Edited By : Balkrishna Madhale