esakal | आता दंडुक्याचीच गरज! जिल्ह्यात टाळेबंदीतही नागरिक रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

आता दंडुक्याचीच गरज! जिल्ह्यात टाळेबंदीतही नागरिक रस्त्यावर

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कोरोना संसर्गाची बाधा सुरू झाल्यापासून जिल्ह्याने कोरोनाबाधितांचा उच्चांक गाठला आहे. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून प्रशासनाने निर्बंध घातले आहेत; परंतु त्याचे नागरिकांना काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते. निर्बंध लागू झाले, तरी रस्ते, दुकाने व मंडईतील गर्दी आहे तशीच दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची उघडउघड पायमल्ली होत आहे. परिणामी, जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण अशक्‍यप्राय बनत चालले आहे. प्रशासनाने दंडुका उगारल्याशिवाय हे सुधारणार नाहीत, अशीच जिल्ह्यातील स्थिती आहे.

जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास गेल्या आठ दिवसांत दरराजे 700 ते अकराशेच्या दरम्यान कोरोनाबाधित सापडत आहेत. काल जिल्ह्यात एकूण एक हजार 395 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्याच्या संपर्कातील लोकांचे अद्याप ट्रेसिंग केलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करत आहेत, तरीही सध्याची आरोग्य यंत्रणा रुग्णसंख्येपुढे अपुरी ठरू लागली आहे. जिल्ह्यामध्ये सरकारी असो वा खासगी, कोणाकडेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्‍सिजन बेडही काही प्रमाणात मिळत आहेत. शासकीय यंत्रणेत जागा मिळाली नाही, तर नाईलाजाने नागरिकांना खासगी दवाखान्यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जणांवर कर्जाचा डोंगर वाढतो आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबाधित सापडत असताना काही गावागावांत 50 पेक्षा जास्त रुग्ण सापडत असताना त्याची झळ अद्याप न पोचलेल्यांना मात्र या सर्व बिकट परिस्थितीची काहीच जाण दिसत नाही.

अभिमानास्पद! शिवरायांच्या भुमीतील 'प्रियांका'ची दमदार कामगिरी

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात उद्रेक मांडला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरात, गावात त्याचे चटके बसत आहेत. त्याची जाणीव असल्यानेच शासनाने नागरिकांवर निर्बंध घातले आहेत. नागरिकांची खाण्यापिण्याची व अत्यावश्‍यक कामाची अबाळ होऊ नये, यासाठी शासनाने काही सवलती दिल्या आहेत; परंतु महामारीचा एवढा प्रकोप सुरू असतानाही या सवलतीमध्ये गर्दी करण्याची संधी शोधाण्याचे काम काही नागरिकांकडून होत आहे. 15 दिवसांचे कडक निर्बंध पाळायचे आहेत, त्यापूर्वी खरेदीसाठी वेळही मिळाला होता; परंतु किराना दुकानातील गर्दी काही कमी होत नाही. दुकानावर नुसती झुंबड उडत आहे.

Video पाहा : विनाकारण फिरताय मग कोविड टेस्ट करा!

सातारा शहराचा विचार करायचा झाल्यास प्रत्येक पेठत भाजीपाला विक्रेते येत आहेत; परंतु तरीही सकाळ, सध्यांकाळी मंडईच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता मंडई ओसंडून वाहत आहेत. प्रत्येक पेठेत, प्रत्येक गावात दुकाने आहेत. निर्बंधाच्या या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून त्याचा वापर थोडा खर्चिक ताण सहन करूनही प्रत्येकाने करणे अपेक्षित होते; परंतु हे सामाजिक भानच हरपले गेल्याचे रस्ते, दुकाने, मंडई यातील गर्दीवरून समोर येत आहे. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो; परंतु प्रशासनाच्या शब्दांचा परिणाम होत नसल्याचे स्पष्टच आहे. त्यामुळे नाठाळाच्या माथी काठीच हाणायची वेळ आली आहे. जिल्ह्यामध्ये चाललेला कोरोना उत्पात थांबविण्यासाठी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे.

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या 200 जणांवर कारवाई; शाहूपुरीतील दोघांवर गुन्हा

गर्दी होणारी ठिकाणी...

  • भाजी मंडई

  • किराणामाल दुकाने

  • लसीकरण केंद्रे

  • मेडिकल स्टोअर

  • प्रत्येक रुग्णालयाबाहेर

Edited By : Balkrishna Madhale