कर्करोग, संसर्गजन्य रोगावर "नॅनोकार्गो' उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान

संजय जगताप
Thursday, 21 January 2021

डॉ. नानासाहेब थोरात हे युरोपियन कमिशनचा बहुमान मिळवणारे पहिले व एकमेव भारतीय आहेत. त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन युरोपियन कमिशनने 2021 ते 2027 मध्ये राबवल्या जाणाऱ्या कर्करोग आणि संसर्गजन्य रोगांच्या हेल्थ मिशनवर सदस्य, 2021 मध्ये ब्रिटन सरकारच्या कॅन्सर रिसर्च मिशनचे कामयमस्वरूपी मानद सदस्यपद आणि ब्रिटन सरकारच्या रिसर्च आणि इनोव्हेशन (UKRI) मिशनच्या तरुण संशोधन गटाच्या कार्यकारी सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे. 

मायणी (जि. सातारा) : नॅनोटेक्‍नॉलॉजी, आयुर्वेद आणि लेसर अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकत्रित करून कर्करोग आणि संसर्गजन्य रोग या दोन्ही आजारांवर एकाच प्रभावी उपचारपद्धतीचे संशोधन करणारे येथील सुपुत्र डॉ. नानासाहेब थोरात यांच्या संशोधनावर युरोपियन युनियन कमिशनने "ब्राईट साईड ऑफ 2020' हा सर्वोत्कृष्ट संशोधनाचा प्रथम क्रमांकाचा बहुमान देऊन शिक्कामोर्तब केले आहे. या उपचार पद्धतीने कर्करोगाची गाठ (ट्यूमर) केवळ 30 मिनिटांत निष्क्रिय होत आहे.
 
इंग्लंड येथे ऑक्‍सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. थोरात मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2016 ते 2020 या चार वर्षांमध्ये युरोपियन कमिशनच्या अर्थसाह्याने "नॅनोकार्गो' हा संशोधन प्रकल्प राबवला. संपूर्ण जगाला कर्करोग, जिवाणू किंवा विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा विळखा पडला आहे. त्यावर 100 टक्के परिणामकारक औषध किंवा प्रभावी उपचारपद्धती शोधणे अवघड आहे. मात्र, डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी राबविलेल्या "नॅनोकार्गो' संशोधन प्रकल्पात नॅनोटेक्‍नॉलॉजी, आयुर्वेद व लेसर अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकत्रित करून दोन्ही आजारांवर एकच प्रभावी उपचारपद्धती शोधण्याचे कार्य केले. 

उपचारपद्धतीचे कार्य कसे चालते? 

चुंबकीय गुणधर्म असणारे गोल्ड नॅनो पार्टिकल्स आणि त्यावर अँटिकॅन्सर आणि अँटिबॅक्‍टेरियल गुणधर्म असणारा आयुर्वेदिक पदार्थ कुरक्‍युमिन (हळद) यांचे संयुग तयार केले. हे नॅनो संयुग चुंबकीय ऊर्जा आणि लेसर किरणांच्या साह्याने सक्रिय करून कर्करोगाची गाठ (ट्यूमर) आणि प्रतिजैविकाला विरोध करणारे बॅक्‍टेरिया या दोन्हींना 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 100 टक्के निष्क्रिय करते. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकीय ऊर्जा वापरून हे नॅनो संयुग शरीरामध्ये ज्या ठिकाणी गाठ आहे, अशा ठिकाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय लक्षित करता येते, तसेच हे नॅनो संयुग वापरून कर्करोगाचे निदान करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करता येते. ज्यामुळे निदान लवकरात लवकर होऊन रुग्णांचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करता येतो. 

लवकरच मानवी उपचारांसाठी... 

स्वित्झर्लंडमधील प्राण्यांच्या प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचण्या झाल्या असून, हे संशोधन, तंत्रज्ञान फक्त प्रयोगशाळेत न राहता लवकरात लवकर मानवी उपचारपद्धतीत हस्तांतरित करण्यात येणार आहे. युरोपियन युनियन या युरोपमधील 28 देशांचा समूह आणि युरोपियन कमिशनने 2020 मध्ये मानवी जीवन सुखकर करणारे संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रातील दहा सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प जाहीर केले. त्यात सर्वश्रेष्ठ प्रथम क्रमांकाचा मान डॉ. थोरातांच्या संशोधनास मिळाला आहे. 

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी 

डॉ. थोरात पहिले व एकमेव भारतीय 

डॉ. थोरात हे युरोपियन कमिशनचा बहुमान मिळवणारे पहिले व एकमेव भारतीय आहेत. त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन युरोपियन कमिशनने 2021 ते 2027 मध्ये राबवल्या जाणाऱ्या कर्करोग आणि संसर्गजन्य रोगांच्या हेल्थ मिशनवर सदस्य, 2021 मध्ये ब्रिटन सरकारच्या कॅन्सर रिसर्च मिशनचे कामयमस्वरूपी मानद सदस्यपद आणि ब्रिटन सरकारच्या रिसर्च आणि इनोव्हेशन (UKRI) मिशनच्या तरुण संशोधन गटाच्या कार्यकारी सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे. 

""या तंत्रज्ञानाचा फायदा भारतीयांना होण्यासाठी युरोपियन कमिशनबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरण करून भारतात स्टार्टअप कंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता मिळवली आहे. लवकरच भारतीय कंपनी नियामक मंडळाकडे नोंदणी करून ते तंत्रज्ञान भारतीय हेल्थ मार्केटमध्ये आणले जाणार आहे. त्यासाठी जगभरातील मराठी तरुण संशोधक आणि तरुण उद्योजकांना पुण्यामध्ये एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'' 

- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ संशोधक, ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Researcher Dr Nanasaheb Thorat Honoured In Europe Cancer Satara Marathi News