प्रतापगडाच्या तटबंदीसाठी 'सह्याद्री' धावला!

संदीप गाडवे
Thursday, 10 September 2020

महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गडप्रेमींकडून सातत्याने होत आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 'दुर्गसेवक' या हॅशटॅग सहित सोशल मीडियावर योगदान देण्याचे आवाहन केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन मोहीम हा सामाजिक उपक्रम राबवत असून गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे.

केळघर (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम शौर्याची कहाणी सांगणाऱ्या व दुर्गम जावळी खोऱ्यात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेल्या ऐतिहासिक प्रतापगड तटबंदीचा पाया काही महिन्यांपासून ढासळत आहे. या गडाच्या संवर्धनासाठी "घेतला वसा, दुर्गसंवर्धन चळवळीचा" या टॅगलाइन सहित सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेने पुढाकार घेतला आहे. 

किल्ले प्रतापगड हा आदिलशहाचे सरदार जावळी खोऱ्यातील मातब्बर चंद्रराव मोरे यांच्याकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याशी बोलणी करुन मागून घेतला होता. मात्र, चंद्रराव मोरे यांनी किल्ला द्यायला नकार दिल्याने छत्रपती शिवरायांनी मोरे यांच्याशी युद्ध करून हा किल्ला जिंकून घेतला. सन १६५६ ते १६५८ या दोन वर्षांत शिवाजी महाराजांनी ह्या दुर्गम किल्याचे बांधकाम केले होते. ज्या वेळी आदिलशाहीचा सरदार अफजलखान हा ४० हजारांची तगडे सैन्य घेऊन आले होता. त्यावेळी मोठ्या चातुर्याने प्रतापगडच्या पायथ्याशी या अफजलखानचा कोथळा छत्रपतींनी बाहेर काढला होता. स्वराज्यावर आलेले संकट शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे दूर झाले होते.

शिवविचार खरंच आपण अंमलात आणतो का? : अश्विनी महांगडे

अफजलखानाचा वध याच प्रतापगडाच्या साक्षीने झाला. या किल्याच्या बांधकामाला ३५० वर्ष उलटून गेली असून या गडाच्या तटबंदीचा पाया काही महिन्यांपासून ढासळत आहे. प्रतापगडावर ध्वज बुरुज आहे. त्या बुरुजाखालीच माचीची दरड कोसळली आहे. भविष्यात हा बुरुज ढासळू शकतो, त्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान ह्या संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. यासाठी संस्थेला आर्थिक सहाय्याची गरज असून स्वराज्य निधीचे संकलन सुरू करण्यात आले आहे.

...अखेर माजी सैनिकांच्या लढ्यास यश; महाविकासने घेतला माेठा निर्णय

महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गडप्रेमींकडून सातत्याने होत आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी दुर्गसेवक या हॅशटॅग सहित सोशल मीडियावर योगदान देण्याचे आवाहन हरिश्चंद्र बागडे, सूरज नाळे यांनी केली आहे. या गडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ही सहकार्य करणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे. बांधकाम करण्याबाबतची परवानगी ही सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्व खाते, वन विभाग यांच्याकडून घेतली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली लोकनिधीतून प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम हाती घेणार आहे.

उदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा!

संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन मोहीम हा सामाजिक उपक्रम राबवत आहे. गड संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान लोकनिधीतून महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात या प्रतिष्ठानच्या २५० शाखा असून जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील २५० हून अधिक युवक सह्याद्री प्रतिष्ठानचे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत.
-श्रमिक गोजमगुंडे, संस्थापक अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative Of Sahyadri Pratishthan For Conservation Of Forts Satara News