लोणंद बाजार समितीत शेतकऱ्यांवर अन्याय; आडते, व्यापाऱ्यांकडून दुजाभाव

विशाल गुंजवटे
Saturday, 26 September 2020

माण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असताना बाजार समितीत कांदा खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना फलटण, लोणंद, सांगलीला कांदा विक्रीसाठी न्यावा लागतो. मात्र, तिथे आडते, व्यापाऱ्यांकडून दुजाभाव होताना दिसून येतो. अशा प्रकारांचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे.

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुका बाजार समितीच्या निष्क्रियतेमुळे तालुक्‍यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फलटण, लोणंद, सांगली, बारामती आदी ठिकाणच्या बाजार समित्यांत कांदा विक्रीसाठी न्यावा लागतो. मात्र, लोणंदसारख्या बाजार समितीत माणच्या शेतकऱ्यांवर अन्याय होताना दिसून येतो. चांगला माल असूनही खराब मालाप्रमाणे आडते-व्यापारी मालाची बोली लावत असतात. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपला माल परत आणून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. 

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असताना बाजार समितीत कांदा खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना फलटण, लोणंद, सांगलीला कांदा विक्रीसाठी न्यावा लागतो. मात्र, तिथे आडते, व्यापाऱ्यांकडून दुजाभाव होताना दिसून येतो. अशा प्रकारांचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे. लोणंद बाजार समितीत माण तालुक्‍यातील पांगरी, येळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी नेला होता. त्या ठिकाणी माण तालुक्‍यातील सोडून इतर शेतकऱ्यांचे कांद्याचे लिलाव 3,850 रुपयांपर्यंत झाले. 

पावसामुळे कोबीवर घाण्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव 

मात्र, माणच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चांगल्या मालाला कवडीमोल दर देत 150 ते 300 रुपये क्विंटलला दर मिळेल, असे सांगितले. दरात एवढी तफावत पाहून शेतकऱ्यांनी आडत्यांना विचारणा केली तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून 11 शेतकऱ्यांनी आपला कांदा तसाच माघारी आणत या प्रकाराचा निषेध व्यक्त करत लोणंद बाजार समितीकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. 

मसूरला पावसामुळे पीक काढणीस व्यत्यय; शेतकरीवर्ग चिंतेत
 
माण बाजार समितीत कांदा खरेदी केला जात नसल्याने शेतकऱ्यांना दुसरीकडे कांदा घेऊन जावे लागते. तिथे शेतकऱ्यांची अडवणूक करून कवडीमोल दराने माल खरेदी करून अन्याय केला जात आहे. लोणंद येथेही असाच प्रकार घडल्याने आम्ही शेतकऱ्यांनी कांदा माघारी आणला. 

-चंद्रकांत जगदाळे, शेतकरी, पांगरी (ता. माण) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injustice On Farmers In Lonand Bazar Samiti Satara News