उपमुख्यमंत्र्यांचा आदेशाच्या कार्यवाहीस प्रारंभ, शैक्षणिक संस्थाचालकांची उडाली घाबरगुंडी

उमेश बांबरे
Monday, 20 July 2020

जिल्ह्यात 27 जूलैपासून तालुकानिहाय होणारी बिंदुनामावलीची तपासणीची तारीख अशी आहे. फलटण 27, माण 28, खटाव 29, सातारा 30, कोरेगाव 31, पाटण तीन, वाई चार, कऱ्हाड पाच, जावळी सहा, खंडाळा सात, महाबळेश्‍वर दहा तारखेला तपासणी होईल.

सातारा : शासनाने काही शाळांना 20 व 40 टक्के अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे; पण यातील काही शाळा बिंदुनामावलीच्या अटींची पूर्तता करत नसल्याने अनुदान देताना वित्त विभागाची अडचण होत आहे. त्यामुळे बिंदुनामावलीची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने धडक मोहीम राबविण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार येत्या 27 जुलै ते दहा ऑगस्ट दरम्यानही तपासणी होणार आहे. यामुळे अशा शाळांची घाबरगुंडी उडाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सरकारचा हिरवा कंदील
 
जिल्ह्यात अनुदानित शाळांची संख्या कमी आहे; पण मध्यंतरी जून महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राज्यातील काही शाळांना 20 व 40 टक्के अनुदान देण्याबाबत बैठक झाली होती. यावेळी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही शाळा बिंदुनामावलीच्या अटी व शर्ती पूर्तता करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे अनुदान देताना वित्त विभागाची अडचण होत होती. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश देऊन राज्यातील सर्व शाळांची बिंदुनामावली तपासणीची धडक मोहीम राबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार जुलैमध्ये ही तपासणी होणार होती. मात्र, सातारा जिल्ह्यात दहा दिवस लॉकडाउन होणार असल्याने या तपासणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 27 जुलै ते दहा ऑगस्टपर्यंत ही तालुकानिहाय तपासणी केली जाणार आहे. प्रथम शिक्षण विभागाकडून प्रथम तपासणी होणार आहे. अंतिम तपासणी सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्ष पुणे यांच्याकडून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा शाळा व्यवस्थापनांची घाबरगुंडी उडाली आहे.

'या' उपक्रमशील शिक्षकांचे संजय भागवतांनी केले कौतुक; 'सकाळ'च्या पुस्तकात स्थान

जिल्ह्यात 27 जूलैपासून तालुकानिहाय होणारी बिंदुनामावलीची तपासणीची तारीख अशी आहे. फलटण 27, माण 28, खटाव 29, सातारा 30, कोरेगाव 31, पाटण तीन, वाई चार, कऱ्हाड पाच, जावळी सहा, खंडाळा सात, महाबळेश्‍वर दहा तारखेला तपासणी होईल. तपासणी करताना त्यादिवशी संबंधित संस्थेचा अध्यक्ष, सचिव, संचालक व माहीतगार लिपिक यापैकी एकाच व्यक्तीस ओळखपत्राच्या आधारे तपासणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. तपासणीस येताना संस्थेच्या संबंधित व्यक्तीने बिंदुनामावली रजिस्टर, संच मान्यतेच्या प्रती, शिक्षक, शिक्षकेतर वैयक्तिक मान्यतेच्या प्रती, तसेच संबंधित कागदपत्रे ही अध्यक्ष व सचिवांच्या सहीशिक्‍क्‍यानिशी असावीत. तपासणी कक्षात मास्क लावलेल्या व्यक्तीलाच प्रवेश असेल, तसेच सर्व कक्ष सॅनिटाईज करावा लागणार आहे.

त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले... 

माणदेशाचे दुदैव...लाखोंची ग्रंथसंपदा पोत्यात पडून!, कोठे हे वाचा...

शिपाई संवर्ग वगळता उर्वरित सर्व संवर्गाची बिंदुनामावली तपासणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपली बिंदुनामावली यामध्ये तपासून घ्यायची आहे. मागील वर्षी तपासणी झाली असली, तरी या धडक मोहिमेत पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. टप्पा अनुदान व घोषित शाळांना यामध्ये तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे काही शाळांच्या व्यवस्थापनांची घाबरगुंडी उडाली आहे. 

पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात 

Video : सातारा सांगलीच्या हद्दीवरील चेकपोस्टची 'या' मंत्र्यांकडून अचानक पाहणी

""उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या संस्थांचे मुख्यालय सातारा जिल्ह्यात आहे. त्यांनी बिंदुनामावलीची तपासणी करून घ्यावी. यामध्ये संबंधित संस्थेने कॅटेगरीप्रमाणे भरती केली आहे का, याची खात्री केली जाते, तसेच नवीन आरक्षणात ईडब्ल्यूएस, एसईसीबीसीची भरती झाली आहे का. कोणत्या प्रवर्गाचा अनुशेष बाकी आहे, याची तपासणी होते. त्यानुसार 
अटी शर्ती पूर्ण करणाऱ्यांना अनुदान मिळते.'' 

राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा. 

""राज्यातील खासगी शाळांची बिंदुनामावली तपासणीचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. यामुळे संवर्गातील इतर गरजू शिक्षकांना नोकरी मिळण्याची शक्‍यता आहे. शासनाच्या तिजोरीला छिद्र पाडून ज्या नियुक्‍त्या केल्या जातात. ते गैरप्रकार रोखले जातील. यातून अनुशेषाचे खासगी शाळांतील नेमके चित्र उघड होणार आहे.'' 

शिवाजी राऊत, माहिती अधिकार कार्यकर्ते, सातारा. 

Edited By Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection Begins In Maharashtra Fulfillment For Reserved Seats Teachers Educational Institute :