वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा : पोलिस निरीक्षक कळके

राजेंद्र ननावरे
Saturday, 10 October 2020

अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक विभाग मुंबईचे डॉ. भूषणकुमार उपाध्ये यांच्या संकल्पनेतून तासवडे टोलनाक्‍यावर कोरोना काळात सोशल डिस्टन्स ठेऊन अपघात रोखण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ कळके व सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी प्रवासी व वाहनचालकांना सूचना दिल्या.

मलकापूर (जि. सातारा) : महामार्गावर वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. त्यामुळे अपघात होणार नाहीत व मृत्यूचे प्रमाणही कमी होईल. तुमच्या व इतरांच्या कुटुंबाचा विचार करा, असे भावनिक आवाहन येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी केले. 

अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक विभाग मुंबईचे डॉ. भूषणकुमार उपाध्ये यांच्या संकल्पनेतून येथील तासवडे टोलनाक्‍यावर कोरोना काळात सोशल डिस्टन्स ठेऊन अपघात रोखण्यासाठी श्री. कळके व सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी प्रवासी व वाहनचालकांना सूचना दिल्या. श्री. कळके म्हणाले, महामार्गावर येण्यापूर्वी वाहन सुस्थितीत आहे का, याची खात्री करा, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका. मद्यप्राशन करून वाहन चालवू नका. अपघात झाल्यास पळून न जाता अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत करा, असे आवाहन केले.

कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांतही कंपोस्ट खतनिर्मिती; कऱ्हाड पालिकेचा स्तुत्य उपक्रम 

श्री. जाधव म्हणाले, महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्ये यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. महामार्गावरील अपघाताची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे. वेगमर्यादेचे उल्लंघन करू नका. नियंत्रित वेगात वाहन चालविल्यास अपघात होणार नाही.'' या वेळी वाहनधारकांना व चालकांना सूचना देऊन गाड्यांना रिफ्लेक्‍टर बसवण्यात आले. यावेळी सहायक फौजदार राजू बागवान, सिकंदर लांडगे, पोलिस नाईक प्रकाश कारळे, वैभव निकम, दादा राजगे, सचिन घोरपडे, मधुकर पवार, वैभव पुजारी यांची उपस्थिती होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions Given To The Drivers By The Police On The Toll Plaza At Taswade Satara News