हॉकर्स झोनचा तोडगा पाचव्यांदा कागदावरच; पालिका-पोलिसांत समन्वयचा अभाव

सचिन शिंदे
Saturday, 14 November 2020

दहा वर्षांपासून रखडेलेला येथील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागल्याचे जाहीर करूनही तब्बल सात महिने झाले. मात्र, अद्यापही तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. पोलिस व पालिकेचा समन्वय कमी झाल्याने त्या प्रश्नात कोणीच हात घालण्यास तयार नाही. त्यामुळेही अडचणी येत आहेत. तब्बल दहा वर्षांपासून पालिकेत किमान 15 मॅरेथॉन बैठका पार पडल्या.

कऱ्हाड (जि. सातारा) : दहा वर्षांपासून रखडेलेला येथील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागल्याचे जाहीर करूनही तब्बल सात महिने झाले. मात्र, अद्यापही तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. निर्णय होऊनही दहा वर्षांत तब्बल पाचव्यांदा अंमलबजावणी न झाल्याने हॉकर्स झोनचा आराखडा कागदावरच राहिला आहे. पालिका व पोलिसांमध्ये समन्वय नसल्याने किमान डझनभर बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे तोडगा कागदावर राहतो आहे. 

नगराध्यक्षा रोहणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, "जनशक्ती'चे नेते राजेंद्र यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला सभापती स्मिता हुलवान, बांधकाम सभापती किरण पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारुखपटवेकर यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास मॅरेथॉन चर्चा झाली होती. त्यात मुख्याधिकारी डांगे व उपअधीक्षक गुरव यांची भूमिका महत्त्वाची होती. त्या दोघांचाही बदली झाल्याने तो प्रश्न मागे पडला आहे. त्यामुळे पहिल्यांदा पदाधिकाऱ्यांची अनिच्छा, त्यानंतर कोरोना, लॉकडाउनमुळे ग्रहण, तर आता अधिकाऱ्यांच्या बदलीने हॉकर्स झोनच्या प्रश्नाला खो घातला आहे, अशीच स्थिती पालिकेत आहे. 

तुम्ही एकी ठेवा, बाकीचे मी बघतो; रामराजेंनी दिला नेत्यांना विश्वास

पोलिस व पालिकेचा समन्वय कमी झाल्याने त्या प्रश्नात कोणीच हात घालण्यास तयार नाही. त्यामुळेही अडचणी येत आहेत. तब्बल दहा वर्षांपासून पालिकेत किमान 15 मॅरेथॉन बैठका पार पडल्या. मात्र, हाकर्स झोनचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नव्हती. अखेर मार्चमध्ये त्या हॉकर्स झोनच्या पहिल्या टप्पा करण्याची भीष्म प्रतिज्ञा झाली. त्यानुसार बस स्थानक परिसरातील 107 हातगाडाधारकांचे पुनर्वसन होणार होते. त्यासाठी कर्मवीर भाऊराव पुतळ्यामागील मोकळी जागा, शालिमार लॉजकडील रस्ता, नवगृह मंदिराबाहेरील भिंतीची जागा, जुन्या राजमहल टॉकीजच्या बाहेरील जागा, टाऊन हॉलचे जुने प्रवेशद्वार अशा वेगवेगळ्या मोकळ्या जागा निवडण्यात आल्या होत्या. तेथे हातगाडीधारकांना हॉकर्स झोन जाहीर केल्याची घोषणा जनशक्ती आघाडीने केली खरी मात्र घोषणेला सात महिने झाले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. लॉकडाउन, कोरोनाच्या काळातील ते काम होणे शक्‍य नव्हते. मात्र, अनलॉकच्या काळातही त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही, बस स्थानक परिसरात डोळ्यासमोर घेण्यात आलेला निर्णय आजही पेंडिंग दिसतो आहे. 

चला बालदिनाची मजा लुटायला! कोयना धरणासह नेहरू उद्यान पर्यटकांसाठी खुले

...असे होते नियोजन 

  • पालिकेच्या पाहणीनुसार बस स्थानक परिसरातील 107 हातगाडाधारकांसाठी होणार होता हॉकर्स झोन 
  • दत्त चौक ते विजय दिवस चौक हा मुख्य मार्ग पूर्णपणे नो हॉकर्स 
  • पहिल्या टप्प्यात पुनर्वसन नंतर जागांचे वाटप 
  • चार वेगवेगळ्या मार्गावर हॉकर्स झोन जाहीर करून बसण्यास परवानगी 
  • हातगाडेधारक विक्रेत्यांची वर्गवारी करून होणार होते पुनर्वसन 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Issue Of Hawkers Zone In Karad Municipality Has Not Been Resolved Satara News