esakal | टेंभू योजनेचे बाधित घेणार जलसमाधी; रयत क्रांती संघटनेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

टेंभू योजनेचे बाधित घेणार जलसमाधी; रयत क्रांती संघटनेचा इशारा

टेंभू योजनेचे बाधित घेणार जलसमाधी; रयत क्रांती संघटनेचा इशारा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांना आठ दिवसांत टेंभू धरणाच्या पाण्यात गेलेल्या जमिनींचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा संबंधित शेतकरी धरणात जलसमाधी घेतील, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज सचिन नलवडे यांनी टेंभू उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

निवेदनातील माहिती अशी, कृष्णा नदीवर टेंभू येथे २००८ रोजी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गोवारे, सैदापूर, मलकापूर या गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेल्या १२ वर्षांपासून पाण्याखाली गेली. जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा: आगाशिवनगरमधील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा

धरणाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक वेळा शेतकऱ्यांनी टेंभू उपसा सिंचन विभागाला अर्ज, निवेदने दिली. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी सदर निवेदनाला केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. गोवारे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी २०१७ रोजी वर्तमानपत्रात कृष्णा खोरे महामंडळाने खरेदी पूर्व नोटीस दिली होती, तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली नाही.

धरण बाधित शेतकऱ्यांनी एक तर आमची धरणाच्या पाण्यात गेलेली जमीन तरी परत दया, अन्यथा मोबदला तरी दया, अशी मागणी आहे. त्यासंदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास सहकुटुंब टेंभू जलाशयात जलसमाधी घेण्याचा इशारा श्री. नलवडे, राजेंद्र पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पवार, प्रफुल्ल कांबळे, शीतल पवार व गोवारे, सैदापूरच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

loading image
go to top