esakal | आगाशिवनगरमधील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

आगाशिवनगरमधील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : युवकाच्या आत्महत्येस प्रवृत्त ठरल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश बंडू कडव (वय ३४, रा. आगाशिवनगर-मलकापूर) असे वारणा नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरळप पोलीस ठाण्यातील हा गुन्हा तालुका पोलिसांकडे आज रात्री वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मृत मंगेशचा भाऊ गणेश कडव याने फिर्याद दिली असुन त्यावरुन ओंकार खबाले-पाटील, स्वाती राजेंद्र बोराटे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी : मंगेशला विंग येथील ओंकार खबाले-पाटील याने फोन करून दोन सप्टेंबरला बोलवुन घेतले. दुपारी तीनच्या वाजण्याच्या सुमारास मंगेश विंगला गेला होता. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास मंगेशच्या वडिलांना ओंकारने फोन करून मंगेशला येथून घेऊन जावा, नाहीतर त्याला जिवंत ठेवणार नाही, असे सांगीतले. त्यामुळे मंगेशचे वडील तातडीने त्याठिकाणी गेले. त्यावेळी ओंकार खबाले-पाटील याच्यासह त्याची बहिणी स्वाती बोराटे व अन्य चौघांनी मंगेशला मारहाण केल्याचे त्यांना दिसून आले. वडिलांनी ओंकारकडे विनंती करून मंगेशला सोडवले. त्यानंतर मंगेश त्याच्या दुचाकीवरून तेथून निघून गेला.

हेही वाचा: कर्जाला कंटाळून बदनापूर तालूक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! 

मात्र, तो घरी परतला नाही. कुटूंबियांनी रात्री उशीरापर्यंत त्याची वाट पाहिली. त्याचा शोधही घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ओंकारने मंगेशच्या वडिलांना फोन करून मंगेशचा मोबाईल त्याच्याकडे असल्याचे सांगीतले. तसेच तो मोबाईल देताना मंगेशला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही त्याने दिली. दरम्यान, मंगेशचा शोध सुरू असताना पेठ वडगावच्या हद्दीत वारणा नदीच्या पुलावर त्याची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेऊन मंगेशचा शोध सुरू केला. याचदरम्यान शनिवारी मंगेशच्या कुटूंबियांनी तो बेपत्ता असल्याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांसह नातेवाईक त्याचा शोध घेत असताना रविवारी मंगेशचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील कणेगाव गावच्या हद्दीत वारणा नदीपात्रामध्ये आढळून आला, अशी फिर्याद गणेश कडव याने दिली आहे. त्यावरुन मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून कुरळप पोलीस ठाण्यातून हा गुन्हा तालुका पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते तपास करत आहेत.

दोन लाखांची मागणी

मंगेश कडव याच्या आत्महत्येप्रकरणी त्याचा भाऊ गणेश कडव याने फिर्याद दिली आहे. त्यामध्ये संशयीतांनी मंगेशकडे पैशांसह दागिन्यांची मागणी केली होती. मंगेशने वेळोवेळी ती मागणी पुर्णही केली होती. त्यातच ओंकार मोबाईल शॉपीसाठी दोन लाख मंगेशकडे मागत होता, असेही फिर्यादीत म्हंटल्याचे पोलिसांनी सांगीतले.

loading image
go to top