हद्दवाढीतील शेतकऱ्यांना दहा वर्षांनी न्‍याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Justice to farmers in border area after ten years Karad Municipality

हद्दवाढीतील शेतकऱ्यांना दहा वर्षांनी न्‍याय

कऱ्हाड - कऱ्हाडच्या हद्दवाढ भागातील भुयारी गटार योजनेसाठी वाखाण भागात पंपिंग स्टेशन क्रमांक सात प्रस्तावित करण्यात आले होते. या स्टेशनसाठी २०१२ मध्ये जमीन देणाऱ्या ३५ शेतकऱ्यांना टीडीआर मिळवून देण्याचा शब्द लोकशाही आघाडीचे तत्कालीन अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिला होता. मात्र, पालिका स्तरावर हा विषय जाणूनबुजून मागे ठेवला गेला असताना सुभाष पाटील यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना टीडीआर मिळवून दिला.

पालिकेत सुभाष पाटील हस्ते आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके, सौरभ पाटील, अभियंता श्री. ढोणे यांच्या उपस्थितीत टीडीआर प्रमाणपत्राचे वाटप झाले. शहराच्या हद्दवाढीनंतर त्रिशंकू भागासाठी शहराप्रमाणे भुयारी गटार योजनेचा निर्णय तत्कालीन सत्ताधारी लोकशाही आघाडीने घेतला होता. यासाठी विविध ठिकाणी पंपिंग स्टेशन प्रस्तावित करण्यात आली होती. वाखाण रस्त्यावर पटेल लोनच्या मागील बाजूस पौडाचा ओढ्याजवळ पंपिंग स्टेशन क्रमांक सात प्रस्तावित करण्यात आले होते. येथे जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटी करून त्यांना जमिनीच्या बदल्यात टीडीआर मिळवून देण्याचा शब्द सुभाषराव पाटील यांनी दिला. मंगळवार पेठेतील शिंदे व तांबवेकर कुटुंबातील ३५ शेतकऱ्यांनी सुमारे ३२ गुंठे जमीन दिली.

दरम्यानच्या काळात २०१६ मध्ये नगरपालिका निवडणूक झाली. नवे सत्ताधारी आले. लोकशाही आघाडी विरोधी बाकावर गेली. त्यानंतरच्या पाच ते सहा वर्षांच्या काळात भुयारी गटार योजनेतील अडथळे दूर करून ही योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते. टीडीआरचा शब्द दिलेल्या शेतकऱ्यांना तो मिळवून देणे गरजेचे होते. मात्र हा विषय पुढे गेलाच नाही.

पालिकेत आज सुभाष पाटील यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्याना टीडीआर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा वर्षांनी हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल शेतकऱ्यांनी सुभाष पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीचे आभार मानले. या वेळी सुभाष पाटील म्हणाले, की पंपिंग स्टेशन क्रमांक सातची जागा सर्वप्रथम ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी पाहिली होती. नंतरच्या काळात वाटाघाटी केल्या. टीडीआर देण्याच्या शब्द दिला. मध्यंतरीच्या पालिकेतील राजकीय उलथापालथीत त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. प्रश्न मार्गी लागावा, अशी काहींची इच्छा नव्हती, तरीही शेतकऱ्यांनी संयमाने वाट पाहिली. आम्ही हा प्रश्न मार्गी लावला, तरीही काही उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत त्यांनी जमिनी दिल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यांचे आभार मानले.

दप्‍तर दिरंगाईचा फटका, मात्र पाठपुरावा कायम

यात दप्तर दिरंगाईचा अनुभव शेतकऱ्यांना येत होता. मात्र, सुभाष पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाही आघाडीचे तत्कालीन गटनेते सौरभ पाटील यांनी याबाबत पालिका सभेत आवाज उठवला होता. सुभाष पाटील आणि सौरभ पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, नगररचना विभाग सातारा, भूमी अभिलेख यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्याधिकारी रमाकांत डाके व जयंत बेडेकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Justice To Farmers In Border Area After Ten Years Karad Municipality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top