
कास : जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश असलेल्या कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांना काही कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने या ठिकाणी साताऱ्याची ओळख सांगणाऱ्या सातारेन्सिस फूल अगदी तुरळक ठिकाणी दिसत असले, तरी यंदाचा बहरलेला फुलोत्सव हंगाम ऑगस्टमध्ये पाहायला मिळेल, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कारण, मुसळधार पावसानंतर श्रावणाच्या ऊन पावसाच्या खेळात येथील जीवसृष्टी खऱ्या अर्थाने बहरते. फुलांचे गालिचे या वेळीच बहरतात. त्यामुळे आता पठारावर फुले बघण्यासाठी येणाऱ्यांनी याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे.