
कऱ्हाड : तुताऱ्यांची ललकारी, वाद्यांच्या निनादात दांडपट्याचा खेळ सादर करणारे मावळे, झांज पथकाचा निनाद, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय भवानी-जय शिवाजी..., भारतमाता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम यासह अनेक घोषणांच्या उत्साहपूर्ण वातावरणात आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपरिक जयंतीनिमित्त आयोजित दरबार मिरवणूक आज मोठ्या दिमाखात झाली. या वेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीचे क्षण डोळ्यात साठवण्यासाठी हजारो आबालवृद्धांनी गर्दी केली होती.