
काँग्रेसच्या गटाकडून स्वतंत्र आघाडीच्या स्थापनेला बऱ्यापैकी मूर्त स्वरूप आले आहे. काँग्रेस गटाकडून स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे.
Karad Municipal Corporation : कऱ्हाड पालिकेत काँग्रेसची जनपरिवर्तन आघाडी?
- सचिन शिंदे
कऱ्हाड - येथील पालिकेत नेहमीच आघाड्यांवर आधारित राजकारण चालते. त्यामुळे पक्षीय पातळीवर किती ताकद मिळेल, याचा अंदाज घेण्याचे काम सुरू असतानाच काँग्रेसच्या दिग्गज गटाकडून जनपरिवर्तन आघाडीच्या नोंदणीच्या हालचाली सुरू आहेत. ऐन वेळी पक्षीय चिन्हावर निवडणुकी लढविण्यास हरकत आली किंवा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास काँग्रेसच्या गटाची आघाडी असावी, यासाठी जनपरिवर्तनाचा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात दहा दिग्गज नगरसेवकांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. आघाडीचे नेतृत्व काँग्रेसला मानणाऱ्यांकडेच असेल.
गेल्या निवडणुकीत जनशक्ती, यशवंत, लोकसेवा व लोकशाही या स्थानिक आघाड्यांसह भाजप, वंचित, एमआयएम पक्षांनी निवडणुका लढविल्या. त्यात भाजपने नगराध्यक्षपदावर बाजी मारत काही नगरसेवकही निवडून आणले. त्या वेळी आघाड्यांचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात काँग्रेस पक्षाची फरफट झाल्याचे पुढील पाच वर्षांतही पाहायला मिळाले. त्यामुळे ती स्थिती यावेळी येऊ नये, याची काळजी काँग्रेसच्या गटाने घेतल्याचे दिसते. त्यांच्या राजकीय हालचालीवरून तेच निर्देशित होते. पक्ष चिन्हासाठी काँग्रेससह भाजपमधील नेत्यांचा आग्रह असला, तरी स्थानिक आघाड्यांना प्राधान्य देण्यासाठी अंदाज घेतला जात आहे.
काँग्रेसच्या गटाकडून स्वतंत्र आघाडीच्या स्थापनेला बऱ्यापैकी मूर्त स्वरूप आले आहे. काँग्रेस गटाकडून स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाविष्ट आहेत. ऐन धामधुमीत काँग्रेसने त्यांच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी ऋतुराज मोरे यांच्या खांद्यावर देत नवा पर्याय व युवा चेहरा पक्षाला दिला. भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी युवा चेहरा आहेत. त्या तुलनेत युवा चेहरा देण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न अधिक चर्चेत आहे. माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी राष्ट्रवादी प्रणीत असली तरी पालिका स्तरावर आघाड्यांचेच राजकारण ते करतात. राजेंद्र यादव सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे त्यांच्या यशवंत विकास आघाडीबाबत ते काय निर्णय घेणार? ते अद्यापही गुलदस्त्यात आहे.
मात्र, राज्यपातळीवर शिंदे-भाजप गटाचे एकत्रीकरण झाल्यास भाजपला यादवांना येथे साथ द्यावीच लागेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या त्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. कॉँग्रेसमधील एका गटाने वेगळा पर्यायातून जनपरिवर्तन आघाडी नोंदणी करण्याचा घाट घातला आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडून इच्छुकांशी संपर्क साधला जातो आहे. बैठका, थेट भेटीवर त्यांचे काम सुरू आहे. व्यक्तिगत पातळीसह राजकीय अनेक गोष्टी राजकीय पटलावर गांभीर्याने घेतल्या जात आहेत. त्याला काँग्रेसमधूनही छुपी साथ आहे. दहा दिग्गजांनी त्याचे ‘कप्तान’पद इंद्रजित गुजर यांच्याकडे दिले आहे.
जो निवडून येईल, त्याला सोबत घेत स्थानिक आघाड्यांच्या जोरावर ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांची ऐतिहासिक कामगिरी करत ४३ वर्षे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यामागेही स्थानिक आघाड्यांचेच कारण होते. तीच स्थिती आता पुन्हा येण्यासाठी लोक पुढे सरसावली आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून निरीक्षण सुरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल, अशी काँग्रेसच्या गटात चर्चा आहे.
भाजपकडूनही चाचपणी...
पालिकेच्या निवडणुकीत भाजपची पदाधिकाऱ्यांवर भिस्त आहे. जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्याशी समन्वय साधत शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची काय भूमिका असणार? ते ही अद्याप अस्पष्ट आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय निर्णय देणार? याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. तोपर्यंत त्यांच्याकडून चाचपणीही सुरू आहे.
पक्षविरहित ‘लोकशाही’
पक्षविरहित सर्वसमावेशक आघाडीद्वारे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडी पालिकेत कार्यरत आहे. लोकशाही आघाडीने त्यांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेसच्याही एका गटाशी बोलणे सुरू आहे. त्यातून योग्य संकेत असले, अद्याप हालचाली नाहीत. महाविकासचा फॉर्म्युला येथे राबविल्यास त्याला कितपत यश मिळणार? याचीही चाचपणी सुरू आहे.