साेळा लाखाच्या बोकडाचा पोलिसांनी लावला छडा; आटपाडीतील तिघे ताब्यात

सचिन शिंदे
Tuesday, 29 December 2020

सुरुवातीला या संशयितांनी हात वर केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. या तीन संशयितांनी मध्यरात्री गाडीमध्ये बोकड टाकून कऱ्हाड येथील डोंगरावर नेऊन ठेवला होता.

कऱ्हाड : आटपाडी (जि. सांगली) येथील आंबेबन मळ्यातील शेतकरी सोमनाथ जाधव यांचा सहा महिन्यांच्या 16 लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेल्या बोकडाचा अवघ्या 24 तासांत पोलिसांनी छडा लावला. कऱ्हाड येथून बोकड आणि चोरून नेणाऱ्या आटपाडीतील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत माहिती अशी, आटपाडी येथे कार्तिक महिन्यात दर वर्षी होणारी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा यावर्षी रद्द केली होती. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन दिवस शेळ्या- मेंढ्यांचा बाजार भरवला होता. या बाजारांमध्ये सोमनाथ जाधव यांनी सहा महिन्यांचा बोकड बाजारामध्ये आणला होता. त्याला पंधरा लाखांची मागणी झाली होती. सोमनाथ जाधव हे येथील आंबेबन मळ्यात कुटुंबीयांसोबत राहतात. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्यांच्या वाड्यातून अज्ञात चोरट्यांनी गाडीत बोकड टाकून पळवून नेला होता. आटपाडी शहरातील जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही गाडी जाताना चित्रीकरण झाले होते. त्या गाडीचा तपास आणि माहिती घेऊन पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते.

हेल्मेट विसरणे पडले महाग, २१४ नागरिकांनी गमावला जीव 

उदयनराजे सर्मथक बाळासाहेबांच्या नगरसेवकपदाच्या अर्जास आव्हान
 
सुरुवातीला या संशयितांनी हात वर केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. या तीन संशयितांनी मध्यरात्री गाडीमध्ये बोकड टाकून कऱ्हाड येथील डोंगरावर नेऊन ठेवला होता. तेथून बोकड पोलिसांनी ताब्यात घेतला, तसेच गाडी आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अवघ्या चोवीस तासांत चोरीस गेलेल्या बोकडाचा पोलिसांनी छडा लावला आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Arrested Three From Aatpadi For Stealing Sheep Satara News