चोऱ्यांत घट असूनही पोलिसांचे तपासात अपयश!

सचिन शिंदे
Saturday, 24 October 2020

कऱ्हाड उपविभागात चार पोलिस ठाणी आहेत. त्यात कऱ्हाड शहर, तालुका, उंब्रज व तळबीड पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. त्यात त्या सर्व पोलिस ठाण्यांत एक हजार 982 गुन्ह्यांपैकी एक हजार 723 गुन्ह्यांचा तपास केला. मात्र, चोरीच्या तपासात पोलिसांना साफ अपयश आले आहे. केवळ 26 टक्केच चोरीचे गुन्हे उघडकीस आणता आलेले आहेत.

कऱ्हाड (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळात अन्‌ त्यापूर्वीही चोऱ्यांच्या तपासात पोलिसांना अपयश आले आहे. मागील वर्षी चोरीच्या दाखल गुन्ह्यांपैकी 26 टक्के गुन्ह्यांचा शोध लावता आला आहे. अन्य गुन्ह्यांच्या तपासात आघाडीवर असलेले पोलिस चोरीच्या तपासात मात्र अपयशी ठरले आहेत. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या "डीबी'लाही फारसे यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. 

उपविभागात चार पोलिस ठाणी आहेत. त्यात कऱ्हाड शहर, तालुका, उंब्रज व तळबीड पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. त्यात त्या सर्व पोलिस ठाण्यांत एक हजार 982 गुन्ह्यांपैकी एक हजार 723 गुन्ह्यांचा तपास केला. मात्र, चोरीच्या तपासात पोलिसांना साफ अपयश आले आहे. केवळ 26 टक्केच चोरीचे गुन्हे उघडकीस आणता आलेले आहेत. 272 चोऱ्यांमध्ये एक कोटी 54 लाख 66 हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. त्यातील एकही मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणता आलेला नाही. चोरीचे 74 टक्के गुन्हे अद्यापही तपासावर आहेत.

कऱ्हाड पोलिस ठाण्यातील गटबाजीने अवैध व्यावसायिकांना बळ

चोरट्यांनी लंपास केलेल्या रकमेपैकी केवळ 20 टक्के रक्कम पोलिसांना जप्त करता आली आहे. मागील वर्षापेक्षा चोरीच्या गुन्ह्यांत घट होऊनही त्याच्या तपासात मात्र पोलिसांना काहीच प्रगती करता आलेली नाही. त्यात कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकालाही केवळ एखाद दुसरा गुन्हा सोडला तर अन्य चोरीचे गुन्ह्यांच्या तपासात अपयशच पदरी दिसते आहे. मागील वर्षी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण 38 टक्के होते. ते यंदा 12 टक्‍क्‍यांनी घटलेले आहे. दरोड्यांसह चोऱ्यांच्या दाखल 272 पैकी केवळ 70 गुन्ह्यांचा तपास करता आला आहे. त्यात 142 संशयित आहेत. त्यातील 118 अटक आहेत. उर्वरित 24 संशयित अद्याप फरार आहेत. किरकोळ चोऱ्या 180 च्या आसपास आहेत. त्याचा तपास करताना पोलिसांना केवळ 38 गुन्ह्यांचा छडा लावता आला आहे. 

अजित पवारांमुळेच सिंचन योजना मार्गी : पालकमंत्री पाटील

वर्षभरातील चोऱ्यांवर एक नजर... 

-कऱ्हाड शहर पोलिस ठाणे : चोरीस गेलेला मुद्देमाल 60 लाख 59 हजार 620 
-कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे  : 58 लाख 91 हजार 280 
-उंब्रज पोलिस ठाणे  : 24 लाख 35 हजार 190 
-तळबीड पोलिस ठाणे  : दहा लाख 79 हजार 930 

...केवळ 31 लाख रिकव्हरी 

वेगवेगळ्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 272 ठिकाणांहून चोरट्यांनी एक कोटी 54 लाख 66 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. 272 पैकी केवळ 70 गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी 31 लाख पाच हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांना अद्यापही 202 चोऱ्यांचा तपास करता आलेला नाही. त्यात एक कोटी 23 लाख 60 हजार 971 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Investigation Fails Satara News