कोकण- पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक "कोकणद्वार' पाडणार

जगन्नाथ माळी
Sunday, 24 January 2021

नवीन पूल अस्तित्वात येईलच पण पुलाच्या आठवणी मार्गावरून जाणाऱ्यांच्या सदैव स्मरणात राहतील.

उंडाळे (जि. सातारा) : कऱ्हाड, रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळेनजीकचा तुळसण ओढ्यावरील पूल रस्ता रुंदीकरणात पाडण्यात येणार आहे. त्यामुळे गेली 50 वर्षे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या व अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या पुलाविषयी अर्थात "कोकणद्वारा'बाबत आठवणींना उजाळा मिळत आहे.
 
हा पूल सन 1970 मध्ये बांधून पूर्णत्वास गेला. पुलाच्या बांधकामात तत्कालीन महामार्गावरील चढ-उतार कमी झाले व कऱ्हाड-काले-उंडाळे-कोकरूड मार्गे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रामध्ये कमी तंत्रज्ञान असूनही एका खांबावर उभा केलेला हा पूल पाहण्यास आजूबाजूच्या गावातील लोक आवर्जून पुलाशेजारी थांबत. गेली काही वर्षे पुलाचे खूप अप्रूप वाटत होते. नंतर मात्र, राज्यमार्गावर अनेक ठिकाणी पूल झाले.
 
पुलाला भौगोलिक महत्त्व प्राप्त आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा येथून कोकणकडे होणारी वाहतूक पूल ओलांडल्यानंतर सुरू होते. म्हणून कोकणचेद्वार असेदेखील पुलास म्हटले जात होते. कोकणातून घाट मार्गातून पश्‍चिम महाराष्ट्राकडे निघाल्यास पुलानंतर सरळमार्गे प्रवेश करता येतो. कऱ्हाड दक्षिण तालुक्‍याचा बहुतांश भाग डोंगराळ आहे व बराचसा भाग शहरी आहे. पुलानंतर सुरू होणारे उंडाळे, येळगाव, येवती खोरे डोंगराळ प्रदेश म्हणून ओळखले जाते. डोंगरी भागात प्रवेश करणारा पूल म्हणून देखील यास ओळखले जायचे. शेतीमाल याच राज्य मार्गावरून कोकणाकडे जातो व कोकणातून कोळसा, खनिजे, सिमेंट, 
पीव्हीसी पाइप आदी माल कऱ्हाड रेल्वे स्टेशनकडे याच मार्गाने येतो. मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवणकडे होणारी गणपती उत्सवातील वाहतूक याच मार्गाने होते. काही दिवसांत पूल वर्तमानातून इतिहासात जमा होईल. चार पिढ्यांच्या दळणवळणाचा साक्षीदार असणारा हा दुवा असणार नाही. असतील ते फक्त अवशेष... त्यानंतर नवीन पूल अस्तित्वात येईलच पण पुलाच्या आठवणी मार्गावरून जाणाऱ्यांच्या सदैव स्मरणात राहतील.

शेतक-याने दिला जून्या परंपरेला उजाळा; वाणवसासह लाडक्या लेकीची पाठवणी केली बैलगाडीतून

संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Ratnagiri Tulsan Bridge Satara Marathi News