Karhad: साखर आयुक्तांच्या बैठकीवर बहिष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर आयुक्तांच्या बैठकीवर बहिष्कार

कऱ्हाड : साखर आयुक्तांच्या बैठकीवर बहिष्कार

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर नऊ दिवसापासुन आंदोलन सुरु आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उद्या (मंगळवारी) साखर आयुक्तांसमवेत या प्रश्नी बैठक आयोजीत केली होती. मात्र त्या बैठकीस साखर कारखानदारांना बोलवलेले नाही. त्यामुळे आम्ही त्या बैठकीस जाणार नसुन बहिष्कार टाकणार आहोत, अशी माहिती बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज दिली.

कऱ्हाड (जि.सातारा) येथे एकरकमी एफआरपीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. त्याचा तोडगा निघावा यासाठई प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी उपप्रादेशीक साखर संचालक संजय गोंधळी, साखर लेखा परिक्षक डी. एन. पवार, पोलिस उपाधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात साखर आयुक्तांबरोबर उद्या बैठक घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार ती बैठक साखर आयुक्तांच्या दालनात होणार आहे.

हेही वाचा: दहावीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची घोषणा

दरम्यान, या बैठकीबाबत माहिती देताना पंजाबराव पाटील म्हणाले, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर उद्या बैठक आयोजीत करण्यात आली आहे. त्या बैठकीस जबाबदार अधिकारी, साखर काऱखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक उपस्थित राहावे, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र त्या बैठकीस मला, स्वाभिमानीचे राजु शेट्टी, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांना बोलवण्यात आले आहे. त्याला कारखान्याचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांना बोलवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या बैठकीत काहीही निर्णय होणार नाही.

आम्हाला बोलवुन केवळ कायद्याचे ज्ञान सांगितले जाणार आहे, असा आमचा समज आहे. त्यामुळे आम्ही त्या बैठकीस जाणार नसुन त्यावर बहिष्कार घालत आहोत. एकरकमी एफआरपीसाठी आम्हाला आंदोलन करायची वेळ आणुन देवु नका, असे आमचे प्रशासनाला शेवटचे सांगणे आहे. बी. जी. पाटील यांनीही इशारा दिला आहे. दरम्यान टाळगावसह विविध गावच्या ग्रामपंचायतींनी आंदोलनास पाठिंबा दिला.

हेही वाचा: सातारा : लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; एकास सक्तमजुरी

पृथ्वीराज बाबांनी पुढाकार घ्यावा

बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनात येवुन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आमची विचारपुस केली. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला, असे सांगुण जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला म्हणाले, आमचा प्रश्न राज्य सरकार आणि सहकार विभाग सोडवू शकताो. पृथ्वीराज बाबांनी आपली ताकत वापरून एकरकमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पुढाकार घेवुन तात्काळ बैठक घेवुन तोडगा काढावा.

loading image
go to top