निम्मे कऱ्हाड शहर रेड झोनमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Karhad Municipal

निम्मे कऱ्हाड शहर रेड झोनमध्ये

कऱ्हाड : बहुचर्चित कऱ्हाडच्या विमानतळ धावपट्टीच्या केंद्रबिंदूपासून तीन किलोमीटरचे हवाई अंतर कायम ठेवत विमानतळ प्राधिकरणाने रेड झोन जाहीर करून कलर कोडिंग नकाशा आज प्रसिद्ध केला. त्यानुसार निम्म्या कऱ्हाड शहराचा रेड झोनमध्ये समावेश झाला आहे. मलकापूर त्यातून वगळले आहे. कऱ्हाडसह वारुंजी, सुपने, विजयनगर, मुंढे गावे पूर्णतः तर गोटे निम्मे गाव रेड झोनमध्ये आले आहे. पाच वेगवेगळ्या रंगात नकाशा प्रसिद्ध झाला आहे. त्यात लाल रंग (रेड झोन) वगळता अन्य चार रंगांच्या हद्दीत ३० मीटरपर्यंतचे म्हणजेच १०० फुटांच्या बांधकामाला विमानतळ प्राधिकरणाच्या न हरकत दाखल्याची गरज नाही, असेही जाहीर केले आहे.

कऱ्हाड विमानतळाचा कलर कोडिंग नकाशा तयार असूनही जाहीर होत नव्हता. त्याबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथे केंद्रीय विमानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. विमानतळ प्राधिकरणाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्यामुळे दोन दिवसांत विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडिंग नकाशा आज प्रसिद्ध केला. त्याची प्रत पालिकेस प्राप्त झाली आहे. नकाशात अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. त्यानुसार तीन किलोमीटरचे हवाई अंतर कायम ठेवले आहे. नकाशानुसार निम्म्या कऱ्हाडवर रेड झोन आहे. कलर कोडिंगचे पाच टप्पे आहेत. त्यात रेड झोन म्हणजेच लाल रंग, जांभळा, निळा, पिवळा व हिरव्या रंगानुसार टप्पे आहेत. विमानतळ धावपट्टीच्या केंद्र बिंदूपासून तीन किलोमीटरवर रेड झोन आहे. त्यात कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास त्यांना विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधितांनी karadnoe@gmail.com या इमेलवर अर्ज करून विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेणे सक्तीचे आहे. लाल रंग वगळता अन्य कोणत्याही रंगाच्या भागात विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत दाखल्याशिवाय तीस मीटर म्हणजे १०० फुटांचे बांधकाम करता येणार आहे.

त्या भागात शहरातील बुधवार पेठेचा काही भाग, कार्वे नाका परिसर, वाखाण रस्ता, मंगळावर पेठेचा मोठा भाग रोड झोनमधून वगळला आहे. तेथील तीस फुटांपर्यंतच्या बांधकामास विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत किंवा परवानगीची गरज नाही. विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कलर कोडिंग नकाशाची माहिती देण्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह अभियंत्यांना पालिका ट्रेनिंग देणार आहे. त्यासाठी बैठक उद्या (मंगळवारी) होणार आहे, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्पष्ट केले.

असा रेड झोन

विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडिंग नकाशा जाहीर केला आहे. त्यामध्ये रेड झोनमध्ये कऱ्हाड शहरातील सोमवार, शुक्रवार पेठ, पूर्णतः समाविष्ट झाले आहे. मंगळवार पेठेतील कमळेश्वर मंदिर, स्मशानभूमीचा रस्ता, टाऊन हॉलचा कोपरा, पालिकेची इमारत, सुपर मार्केटपासून कोल्हापूर नाक्यापर्यंतचा भाग रेड झोनमध्ये आहे. त्यासोबत विमानतळ धावपट्टीपासून तीन किलोमीटरपर्यंत पाटण बाजूलाही रेड झोन आहे. वारुंजीसहित मुंढे, विजयनगर, पाडळी, केसे, सुपने आदी गावे १०० टक्के तर गोटे गावचा निम्मा भाग रेड झोनमध्ये आहे. त्यांना ना हरकत दाखल्यासाठी दिल्ली येथील परवानगी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.