
काशीनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात बगाड यात्रा उत्साहात
वाई : काशीनाथाच्या नावानं चांगभल, च्या गजरात बावधन (ता.वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात व शांततेत पार पडली. बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी ११ वाजता बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाडयास नदीत स्नान घालून देवदेवतांची विधीवत पूजा- आरती करण्यात आली. त्यानंतर बगाडयास पारंपारिक पोशाख घालून बगाडाच्या झोपाळयावर चढविण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस- चाळीस फुटाच्या उंचीच्या शिडावर झोपाळयाच्या साहयाने बगाडयास चढविण्यात येते. यावर्षी हा मान बाळासाहेब हणमंत मांढरे (वय ५२ वर्षे - शेलारवाडी- बावधन) यांना मिळाला.
एका वेळी दहा - बारा बैल जोडयांच्या साहयाने हा रथ ओढण्यात येत होता. ठराविक अंतरावर बैल बदलण्यात येत होते. त्यासाठी ठिकठिकाणी शिवारातून बैल उभे दिसत होते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ, आणि ज्योतिबाची पालखी सुशोभित करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. यावेळी पाच फे-या घालण्यात येत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यात्रा नियोजन समिती नेमली होती. या समितीतील सदस्य बगाडाच्या पुढे व मागे ध्वनीक्षेपकावरून मार्गदर्शन व सूचना करीत होते.
भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास बगाड, वाई- सातारा रस्त्यावर आले. यावेळी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर सात वाजता बगाड गावात मंदिराजवळ पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. मिरवणूकीच्या मार्गावर आयस्क्रीम व शीतपेयाच्या हातगाडया उभ्या होत्या. वाई- सातारा रस्त्यावर दुतर्फा हॉटेल व मिठाई व्यवसायिक, खेळणीवाले, शीतपेयांची विक्री करणा-या फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी बगाड पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी केली होती. दिवसभरात जिल्हयाच्या व राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक बगाड पाहण्यासाठी आले होते. परिसरातील वाडी वस्तीवरील ग्रामस्थ, त्यांचे पै - पाहुणे व नागरिक मोठया संख्येने मिरवणूकीत उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपअधिक्षक डॉ.शीतल जानवे- खराडे, गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक कृष्णा पवार, स्नेहल सोमदे यांच्यासह अन्य अधिकारी ५० पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाची तुकडी, महिला व वाहतूक पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते.
बगाड मिरवणूक शांततेत पार पडली.कोरोना लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी जिल्ह्यातील यात्रा - जत्रावर बंदी घालण्यात आली असतानाग्रामस्थांनी गनिमीकावा करून बगाड मिरवणूक काढून परंपरा कायम राखली. त्यावर काहीं जणांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले. यावर्षी कोरोना कमी झाल्याने बगाड मिरवणुक उत्साहात पार पडली)
Web Title: Kashinath Changbhala Procession Bhairavnath Bagada Yatra Thousands Devotees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..