Video : थांबा...पुढे धोका आहे... "या' घाटात दरडी कोसळण्याची भीती

संदीप गाडवे
शुक्रवार, 10 जुलै 2020

केळघर घाटात काही ठिकाणी रस्ता उकरलेला आहे तर काही ठिकाणी मोऱ्या खोदलेल्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक कठडेच नाहीत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

केळघर (जि. सातारा) : ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहतुकीस अत्यंत असुरक्षित बनलेल्या केळघर घाटातून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवाशांच्यादृष्टीने जिकिरीचे झालेले आहे. एका बाजूने पडणारा मुसळधार पाऊस आणि घाटात कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याची भीती, अशा दुहेरी संकटात गाड्या चालवणे धोक्‍याचे झाले आहे. 

सातारा, रायगड व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना जोडणारा केळघर घाट हा जवळचा मार्ग आहे. तसेच महाबळेश्वरहून महाड तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमी या घाटात वर्दळ असते. सध्या विटा ते महाबळेश्वर राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काळा कडा ते महाबळेश्वरपर्यंत रस्त्याचे काम चांगले झालेले आहे. हा रस्ता वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने येथे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, रुंदीकरण करताना साइडपट्ट्या वाढवल्या नसल्यामुळे धोकादायक दरडी रस्त्यावर येण्याची शक्‍यता आहे.

तसेच वरोशी ते काळा कडादरम्यान केलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर घाटात दरडी आल्याने सिमेंटचा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने असलेला डांबरी रस्ताही पूर्ण न झाल्याने या परिसरात वाहने चालवताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी रस्ता उकरलेला आहे तर काही ठिकाणी मोऱ्या खोदलेल्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक कठडेच नाहीत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या घाटात ठेकेदाराकडून कासव गतीने काम सुरू असल्याने ही स्थिती ओढवली आहे. या घाटातील राहिलेले काम वेळेत पूर्ण न झाल्याने घाटातील प्रवास रामभरोसे ठरत असून, बांधकाम विभागाने तातडीने केळघर घाटातील रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवासी करत आहेत. 

""ठेकेदाराने केळघर घाटात व्यवस्थित काम न केल्यामुळे घाटातून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. धोकादायक दरडी पावसापूर्वी हटवणे आवश्‍यक होते. मात्र, काम संथ गतीने सुरू आहे.'' 

-प्रकाश पाटील, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक, महाबळेश्वर 

संपादन : पांडुरंग बर्गे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kelghar Ghat Unsafe For Transportation Due To Bad Road Condition